गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याला आमचे प्राधान्य असेल, असे पाटीदार आंदोलनाचा युवा नेता हार्दिक पटेलने म्हटले आहे. आरक्षण आंदोलनादरम्यान सत्तारूढ पक्षाने पटेल समाजावर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी भाजपला हटवायचे असल्याचेही तो म्हणाला.

छोटा उदयपूर येथे आयोजित एका सभेत तो बोलत होता. गुजरातमधील भाजप सरकारने आमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे आता भाजपविरोधातील लढाई ही समाजाच्या सन्मानाची असेल. भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. पाटीदारांच्या कोट्यासाठी आमची लढाई सुरूच राहील. येत्या दोन ते तीन वर्षांत आम्हाला यशही मिळेल, असा विश्वासही त्याने या वेळी व्यक्त केला.

पाटीदार आपले प्राण देतील पण भाजपला पाठिंबा देणार नाहीत. मी नेहमी म्हणत आलोय की आम्ही एक-दोन वर्षांत आरक्षणाची लढाई जिंकू. परंतु, आमचे वर्तमान लक्ष्य हे भाजपला धडा शिकवणे आहे, असा इशाराही त्याने दिला.

दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांची आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्यात आरक्षणाच्या मागणीवरून बैठक झाली होती. रात्री उशिरा सुरू झालेल्या या बैठकीला हार्दिक पटेलची अनुपस्थिती होती. कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आरक्षणावर निर्णय घेऊ, असे काँग्रेसने म्हटले होते. बैठकीनंतर पटेल नेत्यांनी समाधान व्यक्त करत अंतिम निर्णय हार्दिकबरोबर चर्चा केल्यानंतर घेतला जाईल असे सांगितले.