मंगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.

संभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी!

सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत. अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.

जीवसृष्टीची दाट शक्यता

मंगळावरच्या मोहिमा या व्हायकिंग यानापासून सुरू झाल्या तेव्हा सत्तरीच्या मध्यावधीचा काळ होता. त्या वेळी मंगळाच्या मातीचे रासायनिक पृथक्करण हा उद्देश होता. चार जैविक प्रयोगही त्यात होते, पण त्यातून फारसे काही हाती आले नव्हते. १९८४ मध्ये असे लक्षात आले की, झेनॉन, क्रिप्टॉन, निऑन, अरगॉन या दुर्मीळ वायूंची समस्थानिक रचना तेथेही पृथ्वीसारखीच आहे. विसाव्या शतकात मंगळ हा कोरडा ग्रह समजला जात होता, पण मार्स ओडिसी यानाला मंगळावर हायड्रोजनच्या खुणा सापडल्याने तेथे पाण्याचे बर्फ असावे असे लक्षात आले. त्यातून उत्सुकता वाढत गेली. हायड्रोजनमुळे सजीवांसाठी आवश्यक कार्बनी संयुगे तेथे असतील अशी अपेक्षा होती. अमेरिकेच्या क्युरिऑसिटी या बग्गीसारख्या गाडीने तेथे कार्बनी संयुगे असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे तेथे सूक्ष्म जीव असावेत याची शक्यता वाढली.

वसाहतयोग्य मंगळ

पृथ्वीवर ३.८ अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टी तयार झाली. ४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ हा साधारणपणे पृथ्वीसारखाच होता. त्याचे वातावरण दाट होते. त्यामुळे तेथे पाणी स्थिर राहू शकत होते. जर हे खरे असेल तर तेथे सूक्ष्म जीव होते असे म्हणता येईल. शुक्र व बुध या ग्रहांचे तापमान सरासरी ४०० अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ते वस्तीयोग्य नाहीत. मंगळाचे तापमान कमी आहे, त्यामुळे त्याचे आकर्षण जास्त आहे. मंगळाचे तापमान विषुववृत्तावर उन्हाळ्यात २० अंश सेल्सियस, तर ध्रुवांवर उणे १२५ अंश सेल्सियस आहे.

‘परसिव्हिरन्स’चे उद्देश

परसिव्हिरन्स मोहिमेचे दोन उद्देश आहेत. एक सूक्ष्म जीवांचा शोध घेणे व मानवाला मंगळावर नेण्यासाठी चाचपणी करणे. ते दोन्ही यात साध्य होणार आहेत, कारण मंगळाच्या पृष्ठभागाची आणखी माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत मंगळावरचे खडक गोळा करून पृथ्वीवर आणले जाणार आहेत. ते खडक जगभरातील संशोधन संस्थांना देण्यात येतील. त्यातून सूक्ष्म जीवसृष्टीचे कोडे उलगडू शकेल. काही नळ्यांमध्ये हे नमुने गोळा करून त्या बंद केल्या जातील व नंतर पृथ्वीवर आणल्या जातील. मंगळावरील नमुने मार्स फेच रोव्हरही गोळा करीत आहे. (फेच रोव्हर- हे युरोपीय अवकाश संस्थेचे बग्गीसारखे वाहन आहे.) दोन्ही गाड्यांनी गोळा केलेले  नमुने परतीच्या यानाकडे दिले जातील. ते यान मंगळावरून उड्डाण करून पृथ्वीवर येईल. मंगळावरचे खडक पृथ्वीवर आणण्याने तेथील सूक्ष्म जीवसृष्टीचे कोडे निर्णायक पातळीपर्यंत उलगडू शकते. ही मोहीम सर्वात महागडी आहे, कारण या खर्चात किमान ५-१० अवकाशयाने इतरत्र पाठवून होतील. आताचे यान हे जेझेरो विवरात उतरले आहे. सुपर कॅम, हॅझकॅम हे कॅमेरे त्यावर आहेत. त्यामुळे तेथील उच्च विवर्तन छायाचित्रे मिळणार आहेत.

मानवी मोहिमांसाठी ऑक्सिजननिर्मिती

मानवी मोहिमांची पूर्वतयारी करण्यासाठी मंगळावर ऑक्सिजन उपलब्ध करणे गरजेचे आहे. तेथील कच्चा माल वापरून ऑक्सिजन तयार करता येईल, असे वैज्ञानिकांना वाटते. मंगळावर ऑक्सिजनची निर्मिती केली तरच मानवी मोहीम शक्य आहे. इलन मस्क यांनी मंगळावर व्यावसायिक पर्यटनाच्या योजना आखल्या असल्या तरी त्या ऑक्सिजनशिवाय शक्य नाहीत. आताच्या मोहिमेत मंगळावर ऑक्सिजननिर्मितीचा प्रयोग केला जाणार असून त्यात ३०० वॅट ऊर्जा वापरून १० ग्रॅम ऑक्सिजन वातावरणातील कार्बन डायॉक्साइड वापरून तयार केला जाणार आहे. ऑक्सिजनचे हे प्रमाण वाढवता आले तर मानवी मोहिमा यशस्वी होतील तसेच पृथ्वीवर परत येण्यासाठी इंधनही मंगळावर तयार करता येईल. यानातील रिमफॅक्स प्रयोगात मंगळाच्या पृष्ठभागाखालील रचनेचा नकाशा तयार केला जाणार आहे. त्यातून तेथे मानवी वसाहत शक्य आहे का हे समजेल. खगोलजीवशास्त्राच्या माध्यमातूनही यात संशोधन केले जाणार असून तेथे सूक्ष्म जीवांचा शोध घेतला जाणार आहे. तेथील भूगर्भीय रचनेवरूनही ते स्पष्ट होऊ शकते.

परग्रहावर प्रथमच हेलिकॉप्टर

मंगळावर ड्रोनसारखे काम करणारे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. हा प्रयोग एखाद्या ग्रहावर प्रथमच केला जात आहे. हे हेलिकॉप्टर मंगळाच्या विरळ वातावरणात फिरू शकते. तेथील वातावरणाची घनता कमी आहे. त्यामुळे असे हेलिकॉप्टर फिरवणे अवघड आहे. सध्या तेथे  मालाची वाहतूक केवळ  रॉकेट इंजिनांनीच शक्य आहे.