बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख व माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांनी मंगळवारी न्यायालयात शरणागती पत्करली असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सरकारविरोधी निदर्शनांच्या वेळी बसवर बॉम्बहल्ला करण्यासाठी जमावास चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला भरण्यात आला असून त्यांच्यावर अटक वॉरंट काढण्यात आले होते पण त्या न्यायालयात उपस्थित राहिल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे महानगर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या समर्थकांनी व नेत्यांनी ढाका येथील महानगर सत्र न्यायालयाचा परिसर गजबजून गेला होता. श्रीमती झिया न्यायालयात आल्या त्या वेळी दंगलविरोधी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता, असे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यात आले.