पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली हवाई तळावरील एका संशयित कर्मचा-यास ताब्यात घेण्यात आले आहे.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पठाणकोट हल्ल्याचा तपास करत असलेल्या पथकाने हवाई तळावरील संशयित कर्मचा-यास तपासासाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेला कर्मचारी हा लष्करी आणि अभियांत्रिकी सेवेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण हवाई तळावरील दिवे रात्रीच्या वेळी चालू होते. मात्र, जी ११ फूट उंच भिंत चढून दहशतवाद्यांनी शिरकाव केला तेवढ्याच भागातील तीन दिवे चालू नव्हते. जेथून दहशतवादी घुसले होते तो भाग अटक करण्यात आलेल्या कर्मचा-याच्या विभागाच्याच बाजूला आहे. चतुर्थ श्रेणीत काम करत असेलल्या या कर्मचा-याची काही दिवसांपूर्वीच उधनपूर येथून पठाणकोटमध्ये बदली करण्यात आली होती. या श्रेणीत काम करत असलेल्या व्यक्तीचे काम अंतर्गत तांत्रिक आणि इतर सामान्य गोष्टींची देखभाल करण्याचे काम यांच्याकडे असते. त्यामुळे सदर कर्मचा-यावर संशय व्यक्त केला जात आहे.
तसे, हल्ल्यावेळी अतिरेक्यांना पाकिस्तानातूनच संपर्क होत असल्याची माहिती मिळते आहे. हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील मुख्य सूत्रधाराशी चर्चा केल्याचे समजते असून पाकमधील दोन फोन क्रमांकांचा खुलासा झाला आहे. एक क्रमांक +९२-३०१७७७५२५३ पठाणकोट हल्ल्यातील एका अतिरेक्याच्या आईचा मोबाइल क्रमांक असल्याचे समजते आहे. तर दुसरा क्रमांक +९२-३०००५९७२१२ आहे. +९२ पाकिस्तानातील कंट्री कोड आहे.