चीनमधील करोना विषाणूच्या साथीचे केंद्र असलेले वुहान शहर व हुबेई प्रांत गेले तीन महिने बंद होते, ते आता पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.  वुहान ही हुबेई प्रांताची राजधानी असून या राज्याची लोकसंख्या ५.६ कोटी आहे. हुबेई प्रांतातील प्रवास बंदी २५ मार्चला उठवण्यात येत असून वुहानमधील संपूर्ण बंदी ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे.

८ एप्रिलपासून वुहानमधील निर्बंध उठवण्यात येत असून त्या शहराची लोकसंख्या १.१ कोटी आहे. तेथे लोकांना सामूहिक पातळीवर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. वुहान हे करोना साथीचे मुख्य केंद्र ठरले होते. तेथे डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. सोमवारी तेथे एक निश्चित रुग्ण सापडला आहे. गेले पाच दिवस तेथे नवीन रुग्णांची संख्या शून्य होती. हुबेई प्रांत व वुहान शहर यांची एकूण लोकसंख्या ५.६  कोटी आहे. यातील बहुतांश लोकांना तीन महिने विलगीकरणातच ठेवण्यात आले होते. २३ जानेवारीपासून तेथे लोकांच्या हालचाली व सर्व व्यवहार यावर बंदी घालण्यात आली होती. बुधवारपासून ग्रीन हेल्थ कोड लागू करण्यात येत असून हुबेईच्या इतर भागातील लोक प्रवास करू शकतील. चीनमध्ये हुबेई प्रांतातील प्रवास बंदी २५ मार्चला उठवण्यात येत असून वुहानमधील संपूर्ण बंदी ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे.

हुबेई आरोग्य आयोगाने म्हटले आहे की,  वुहानच्या रहिवाशांना बाहेर प्रवास करण्यास ८ एप्रिलपासून परवानगी राहील. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कठोर निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येणार असून गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या कमी  झाली आहे. हुबईत एकूण ४२०० रुग्णांवर उपचार चालू असून १२०३ गंभीर अवस्थेत आहेत. एकूण सात बळी काल गेले आहेत. जगात करोना मृतांची संख्या जॉन हॉपकिन्स निदर्शकानुसार १६,५५९ झाली असून रुग्णांची संख्या ३,८१,५९८ झाली आहे, १६८ देशात करोनाची साथ पसरली आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, करोना विषाणूचे ७८ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ७४ परदेशी नागरिक आहेत. त्यामुळे परदेशी रुग्णांची संख्या ४२७ झाली आहे. सोमवारी सात बळी गेले असून ३५ नवीन संशयित रुग्ण सापडले आहेत. सर्व सात बळी हुबेई प्रांतात गेले आहेत.

बीजिंगमध्ये रुग्णांची संख्या ५२२ झाली असून मृतांची संख्या परत वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ७४ परदेशी रुग्ण सापडले असून बीजिंगमध्ये ३१, ग्वांगडाँगमध्ये १४, शांघाय ९, फुजियान ५, तियानजिन ४, जियांगसू ३, झेजियांग २, शिचुआन २ , शांक्सी, लायोनिंग, शांगडाँग, चोंगक्विंग येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

बीजिंगने परदेशातून येणारी विमाने दुसऱ्या शहरात वळवण्यास सुरुवात केली असून या लोकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, करोनाचे १३२ संशयित रुग्ण सापडले आहेत.

वुहान येथे एक निश्चित रुग्ण सापडला असून पाच दिवसांनंतर रुग्ण कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर लगेच रुग्णांची संख्या वाढू लागली. वुहानमध्ये सात बळी गेले असून हुबेईतील मृतांची संख्या ३१६० झाली आहे. तेथे ४४४ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे. ४२०० जणांवर अजून उपचार सुरू आहेत. १२०३ जण अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.

७८ नवीन रुग्ण

चीनमध्ये करोनाचे ७८ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ७४ परदेशी रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मृतांची संख्या ३२७७ झाली असून काल सात बळी गेले आहेत. चीनमध्ये रुग्णांची संख्या ८१,१७१ झाली आहे, त्यात ३२७७ मृतांचा समावेश आहे. अजून ४७३५ रुग्णांवर उपचार सुरू असून ७३,१५९ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.