मी मुस्लिम असल्यामुळेच मोदी सरकार माझा छळ करत असल्याचा आरोप वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईकने केला आहे. राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकार अल्पसंख्याकांना निशाणा बनवत असल्याचे त्याने म्हटले असल्याचे वृत्त ‘सीएनएन-न्यूज 18’ ने दिले आहे. नाईकने यासाठी ‘हिंदू राष्ट्रवादी सरकार’ या शब्दाचा वापर केला आहे. भारत सरकारने आपल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी केलेला अर्ज स्वीकारू नये, अशी विनंती नाईकने इंटरपोलला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

नाईकच्या वकिलांकडून फ्रान्समध्ये असलेल्या विद्यमान इंटरपोल सचिवांना पाठवण्यात आलेले पत्र ‘सीएनएन-न्यूज 18’ ने आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. या पत्रात रेड नोटीस जारी करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. भारत सरकारचा अर्ज हा इंटरपोलच्या संविधान व नियमानुसार नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

नाईकचे वकील कॉर्कर बिनिंग यांनी पत्र पाठवले आहे. नाईक हे न्यायालयापासून पळ काढत नसल्याचे सांगत मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपाचे त्यांनी खंडन केले आहे.

पत्रात म्हटले आहे, एका हिंदू राष्ट्रवादी सरकारने भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांमध्ये मोठे समथर्न असलेल्या धर्मगुरूविरोधात संशयावरून कारवाई सुरू केली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आपली प्रतिष्ठा मलीन करण्यात येत आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचा राजकीय फायद्यासाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.