मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूटमध्ये स्फोट झाल्याने भीषण संकट उभं राहिलं आहे. स्फोटात धान्याचं कोठार उद्ध्वस्त झालं असून आतमध्ये ठेवण्यात आलेला सगळं धान्य नष्ट झालं आहे. यामुळे देशात सध्या एक महिना पुरेल इतकाच धान्यसाठा शिल्लक राहिला आहे. लेबनानच्या अर्थमंत्र्यांनी रॉयटर्सशी बोलताना ही माहिती दिली आहे. मुबलक धान्याचा साठा करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर लेबनानमध्ये किमान तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा असणं गरजेचं होतं. यासाठी आम्ही इतर ठिकाणी असणाऱ्या धान्यसाठ्यांची माहिती घेत होतो. यावेळी देशात एक महिना पुरेल इतकाच धान्यसाठा असल्याचं समोर आलं,” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बैरुटमधील कोठाराची १ लाख २० हजार टन धान्याचा साठा ठेवण्याची क्षमता होता. गहू आर्यात करणाऱ्या युनिअनचे प्रमुख अहमद यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कोठारात १५ हजार टन धान्य होतं. सध्या प्रशासन धान्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.

बैरूट शहरामध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेलं नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बैरूट हादरलं. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे.