एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र मराठी नववर्षांचे उत्साहात स्वागत करीत असताना कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना मात्र कन्नडिगांच्या आकसबुद्धीचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. गुढीपाडव्यानिमित्त बेळगाव परिसरात लावण्यात आलेले मराठी शुभेच्छाफलक तेथील पोलिसांनी बळजबरीने काढून टाकले. चैत्रपालवीच्या सुरुवातीलाच आलेल्या या कटू अनुभवाने सीमावर्ती भागातील मराठीजनांमध्ये संतप्त भावना आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावसह शहापूर, वडगाव, येल्लूर, अनगोळ या मराठीबहुल परिसरात घराघरांवर ‘तुम्ही मराठी, आम्ही मराठी’ असे घोषवाक्य असलेले शुभेच्छाफलक गुढीस्वरूपात उभारले होते. घराघरांवर या मराठी शुभेच्छाफलकांच्या गुढय़ा बुधवार रात्रीपासूनच उभारण्यात आल्या होत्या. मात्र गुरुवारी सकाळी स्थानिक पोलिसांनी हे सर्व शुभेच्छाफलक तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी दमदाटी करून हे फलक काढण्यात आले. फलक काढताना आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. मात्र त्याच वेळी कन्नडिगांनी लावलेले पिवळे-लाल झेंडे तसेच ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे समस्त मराठीजनांमध्ये असंतोष आहे.

शुभेच्छा देणे हा गुन्हा आहे काय?
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या प्रकरणी पोलीस व जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे. सणाच्या शुभेच्छा देणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. आम्ही लावलेले फलक चिथावणीखोर नक्कीच नव्हते. आपली प्रांतीय ओळख दर्शवणे हा गुन्हा कसा असू शकतो, पोलिसांची कारवाई हा घटनादत्त अधिकारांवर घातलेला घालाच असल्याची संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला.