युरोपमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर जर्मनीने बर्लिनमधील मध्यवर्ती रेल्वे स्थानकांवर आणि ड्रेस्डेन येथील सुरक्षेत वाढ केली आहे. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांकडून हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेला परदेशातील सहकाऱ्यांकडून अशा प्रकारचे सावधानतेचे इशारे देण्यात आले आहेत. दोन रेल्वे स्थानके आणि ड्रेस्डेन येथे होणाऱ्या इस्लामविरोधी निदर्शनांच्या वेळी संशयित जिहादींनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. बर्लिनमध्ये शुक्रवारी अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये तुर्कस्तानच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे, मात्र या अटकेचा दहशतवादी इशाऱ्यांशी संबंध नाही, असेही सांगण्यात येत आहे. दूरध्वनी टॅपिंग आणि ई-मेलद्वारे आलेल्या संदेशांवरून परदेशी गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे.