महाराष्ट्रात जितक्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो, तितक्याच उत्साहाने भारताबाहेर स्थायिक झालेली कुटुंबदेखील परदेशात गणेशोत्सव साजरा करतात. उद्योग व्यवसाय अथवा शिक्षणासाठी परदेशात गेलेली मंडळी भारताची संस्कृती तेथे जपण्याचा प्रयत्न करतात. सण-उत्सवाच्या माध्यमातून पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतात.

बेल्जियममध्ये स्थायिक झालेल्या अशाच काही भारतीयांनी यावेळचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे सुशोभित पालखीतून वाजत-गाजत आगमन झाले.

चिकण मातीपासून बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात आली होती. त्याशिवाय, चिकण मातीपासून गजाननाची मूर्ती कशी घडवावी याची कार्यशाळादेखील घेण्यात आली. बाळगोपाळांनी यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

गणेशपूजननानंतर घंटानादात बाप्पाची आरती करण्यात आली. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य, शेरो-शायरी, प्रश्नमंजुषा, लावणी अशा विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी आपल्या कलेचे दर्शन घडविले.

भारतीय दूतावासातील काऊन्सिलर धीरेंद्रसिंग गॅब्रियल कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
(सर्व छायाचित्रे – एलिना वान एलेविक)