नव्या बेनामी संपत्ती प्रतिबंधक कायद्याचा वापर करुन आयकर विभागाने मुंबईतील २० जणांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या प्रकरणातील संशयितांनी आपल्या बॅंक खात्यांचा वापर संदिग्ध वापरासाठी केला होता. ज्या लाोकांच्या खात्यांमध्ये जाहीर उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम जमा आहे त्यांची संपत्ती देखील आयकर विभागाने जप्त केली आहे.  बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार या संशयितांना २७ जानेवारीला नोटीस देण्यात आली होती.

त्यानुसार ही कारवाई झाली असे सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की ज्या लोकांनी बेनामी व्यवहार केले आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी आणि त्यांच्यावर पुढील कारवाई व्हावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंड आणि जास्तीत जास्त ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याआधी, आयकर विभागाने आठ जणांची संपत्ती जप्त केली होती. या आठ जणांनी त्यांचे खाते बेनामी व्यवहारांसाठी वापरले होते.

तसेच ५० जणांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने तयारी चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर आयकर विभागाने वेळोवेळी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन सांगितले आहे की जे लोक बेनामी व्यवहार करतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नवीन कायद्यानुसार चल आणि अचल संपत्तीचे बेनामी व्यवहार केले तर तो गुन्हा ठरणार आहे.  संशयितांपैकी दोन जणांचे खाते सहकारी बॅंकेमध्ये आहे, तीन जणांचे सरकारी बॅंकेमध्ये आहे तर तीन जणांचे खाते हे खासगी बॅंकेमध्ये आहे. नोटाबंदीनंतर या खात्यांमध्ये जाहीर उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. लघु उद्योग, रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसायातील काही लोकांनी तोतयांचा वापर करुन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरले अशी माहिती आयकर विभागाकडे आहे.

नवीन बेनामी कायद्यानुसार चल-अचल संपत्ती, मूर्त-अमूर्त संपत्ती (टँजिबल-इंटँजिबल), मालमत्तेतील अधिकार स्पष्ट करणारे कागदपत्र, एकातून दुसऱ्या मालमत्तेत रूपांतरित करता येऊ शकणारी मालमत्ता या सर्वाचा मालमत्तेच्या व्याख्येत सामावेश करण्यात आलेला आहे. या नवीन व्याख्येनुसार त्यात केवळ जमीनजुमलाच नाही तर दागदागिने, शेअर्स, गुंतवणूक, इत्यादी सगळ्यांचा समावेश आहे. बेनामी व्यवहार म्हणजे असा व्यवहार- ज्यात एका व्यक्तीच्या नावावर एखादी मालमत्ता घेतली जाते, मात्र त्याचा मोबदला दुसरी व्यक्ती देत असते आणि अशी मालमत्ता प्रत्यक्ष मोबदला देणाऱ्या व्यक्तीच्या लगेचच्या किंवा दूरगामी फायद्याकरिता असते.