पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणाचा निकाल गुरूवारी न्यायालयाकडून देण्यात आला. यावेळी न्यायालयाने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले तर अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. दोषी पोलिस अधिकाऱ्यांना १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर या प्रकरणात आरोपी असणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने फरार घोषित केले. यावेळी न्यायालयाने मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले.

२७ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मृत्यू झाला होता. बेनझीर भुट्टो निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी रावळपिंडीत आल्या असताना त्यांच्यावर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी लगेचच खटला दाखल झाला होता. रावळपिंडीतील दहशतवाद विरोधी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. अखेर आज न्यायालयाने या खटल्याचा अंतिम निकाल दिला. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर काही दिवसांतच रफाकत हुसेन, हुसेन गुल, शेर झमान, ऐतियाज शाह, अब्दुल रशिद या पाचजणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस प्रमुख सौद अझिझ आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षक खुरर्म शहजाद यांचाही आरोपींमध्ये समावेश होता. भुट्टो यांच्या जाहीर सभेच्यावेळी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात या दोन अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.या दोघांना सुरूवातीला अटक करण्यात आली होती. मात्र, २०११ मध्ये दोघांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्यामुळे आजच्या निकालावर या सगळ्यांचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, न्यायालयाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी दोषी ठरवत त्यांना १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.