सध्या जगभरात करोनाची साथ चालू असल्याने लोकांना भारतातील प्राचीन योगपरंपरा जास्त गरजेची वाटत आहे, कारण अनेक रुग्णांना कोविड १९ विषाणूवर मात करण्यात योगसाधनेनेच मदत केली आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी योग दिनानिमित्त संदेशात म्हटले आहे.

ते म्हणाले, की करोना विषाणू हा माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करीत असतो व प्राणायाम किंवा श्वसनाच्या व्यायामांनी मानवी श्वसन संस्था मजबूत होते. योग ही एकता निर्माण करणारी शक्ती आहे. योगामध्ये जात, वंश,धर्म, वर्ण, लिंग, देश यावरून भेदभाव होत नाही. योगाने आरोग्यसंपन्न जगाचे  स्वप्न साकार होत आहे. त्यातून मानवतेचे बंध मजबूत होत आहेत. कुणीही योगसाधना करु शकतो.

रविवारी सकाळी पंधरा मिनिटांच्या भाषणात त्यांनी सांगितले,की करोनाची साथ चालू असताना जगाला कधी नव्हे इतकी योगसाधनेची गरज वाटू आहे. जर आपली प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर आपण करोनाचा प्रतिबंध करू शकतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्यात योगासने हा एक आहे. ही आसने आपल्या शरीराची शक्ती तर वाढवतातच शिवाय चयापचय क्रिया सुधारतात.

प्राणायामाच्या फायद्यांबाबत त्यांनी म्हटले आहे, की तो श्वासाचा व्यायाम आहे. शीतली, कपालभाती, भस्त्रिका यातून अनेक फायदे होतात. योगाचे हे प्रकार आपली श्वसन संस्था व प्रतिकारशक्ती मजबूत करतात. त्यात रोज प्राणायाम करणे महत्त्वाचे आहे. जगात अनेक कोविड १९ रुग्नांना योगसाधनेचा फायदा झाला आहे कारण योगामध्ये करोनाचा मुकाबला करण्याची ताकद आहे. योग साधना कुणीही करू शकते त्यासाठी थोडा वेळ व थोडी मोकळी जागा एवढेच गरजेचे असते.

२१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा जगात योगदिन साजरा झाला होता, यंदा करोनामुळे तो डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षीच्या योग दिनी ‘योग अ‍ॅट होम योग विथ फॅमिली’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते.

योगातून आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढते. मानसिक व भावनिक संतुलन टिकून राहते. त्यामुळे आपण अनेक कठीण आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. आपण आरोग्यात सुधारणा केली तर आरोग्य संपन्न पृथ्वीचे स्वप्न दूर नाही. योगाने ते नक्कीच साध्य होईल.    – नरेंद्र मोदी, पंतप्रधान