मालडा येथे एका हॉटेलात आराम करीत असताना आपल्या खोलीला लागलेली आग ‘शॉर्ट सर्किट’ने लागली नसून हा तर चक्कमला ठार मारण्याचा कट होता, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र जर अशा ‘घातपाता’त आपल्या जिवाचे काही बरे-वाईट झालेच तरीही आपण ‘जनतेच्या’ रूपात पुन्हा एकदा उभे राहू, असा इशाराही ममता यांनी दिला.
‘या लोकांना पश्मिच बंगालचं भलं झालेलं पाहावत नाही. आधी मला ठार मारायचं आणि नंतर शॉर्ट सर्किट झाल्याच्या वावडय़ा उठवायच्या.. हा अपघात असल्याचे भासवायचे.. असं सगळं नियोजनबद्धपणे सुरू आहे,’ असा गंभीर आरोप ममता यांनी केला.
पण माझ्यावर हल्ले करू पाहणाऱ्यांनीही हे लक्षात घ्यावे की मला ठार मारायचा जेवढा प्रयत्न कराल तेवढीच मी येथील जनतेमध्ये अधिकाधिक रुजेन आणि नव्या ऊर्जेने पुन्हा एकदा उभी राहीन, असा दावाही त्यांनी केला.
बिरभूम येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

ममता यांच्या सुरक्षिततेबाबत माकपकडून चिंता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षिततेबाबत आपल्याला चिंता वाटत असल्याची भावना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सूरजय कांत मिश्रा यांनी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडे दूरध्वनीवरून त्यांनी ममता यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि निरामय आरोग्य चिंतिले. ममता यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि गरजेनुसार त्यात वाढ करावी, अशी विनंतीही माकपतर्फे करण्यात आली.