भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेमध्ये बंगालमधील एका शेतकऱ्याचा मुलगा महत्वाची भूमिका बजावत आहे. कधी काळी वडिलांसोबत शेतामध्ये काम करणारे चंद्रकांता आता इस्त्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. मेहनत आणि कष्टाच्या बळावर चंद्रकांता आज या टप्प्यावर पोहोचले आहेत.

सोमवारी मध्यरात्री चांद्रयान २ अवकाशात झेपावणार होते. पण तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या मिनिटाला हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले. हुगळी जिल्ह्यातील शीबपूर गावामध्ये राहणारे चंद्रकांता यांचे वडिल मधुसूदन कुमार संपूर्ण गावासह चांद्रयान २ चे प्रक्षेपण याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी रात्रभर जागे होते.

मला इस्त्रोच्या कामाबद्दल फारसे समजत नाही. पण वरिष्ठांचा चंद्रकांता यांच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे असे मधुसूदन कुमार इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. आम्ही रात्रभर जागे होतो. प्रक्षेपण रद्द झाल्याने वाईट वाटले पण प्रक्षेपण यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे असे चंद्रकांता यांच्या वडिलांनी सांगितले.

२००१ साली इस्त्रोमध्ये रुजू झाल्यानंतर चंद्रकांता यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे हाताळल्या. त्यानंतर आज चांद्रयान २ मोहिमेत त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते उपग्रह सिस्टिमचे प्रमुख आहेत. मून रोव्हर आणि पृथ्वीवरील मिशन कंट्रोलमधल्या संवादात या सिस्टिमची महत्वाची भूमिका असणार आहे.