पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. बंगालमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाही केंद्र सरकार बंगालचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांकडे पाठवत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

ममता यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितलं की, बंगालची मेडिकल ऑक्सिजनची गरज गेल्या आठवड्यापासून ४७० मेट्रिक टनवरुन ५५० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. बंगाल सरकारने यापूर्वीही केंद्राकडे हा विषय मांडला होता की आता बंगालला दररोज ५५० मेट्रिक टनची गरज भासत आहे असंही त्यांनी सांगितलं.

ममता आपल्या पत्रात पुढे म्हणतात, “पश्चिम बंगालची ऑक्सिजनची गरज भागवण्याऐवजी भारत सरकारने पश्चिम बंगालमधील एकूण उत्पादनातून अन्य राज्यांचा ऑक्सिजन पुरवठा वाढवला आहे. गेल्या १० दिवसांपासून बंगालला प्रतिदिन ३०८ मेट्रिक टनच ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याची गरज ५५० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी आहे.”

ममता यांनी केंद्राला हेही सांगितलं की, बंगालमध्ये दररोज ५६० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. त्यांनी पंतप्रधानांना बंगालच्या ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्याची विनंतीही केली आहे. तसंच राज्याची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचीही विनंती केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी ११७ मृत्युंची नोंद झाली. आत्तापर्यंतचा राज्यातला हा सर्वाधिक आकडा आहे. तर राज्यात काल १८ हजार ४३१ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात १ लाख २२ हजार ७७४ करोनाबाधित आहेत.