महेश सरलष्कर

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख संघर्ष होत असला, तरी डावे पक्ष-काँग्रेसच्या संयुक्त मोर्चाच्या सक्रियतेमुळे चुरशीत वाढ झाली आहे. त्यामुळे तृणमूल बहुमताच्या नजीक असेल की भाजप, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे मत राजकीय विश्लेषक व ‘जेएनयू’मधील प्रा. द्वैपायन भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.

माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत प्रचंड घसरण होऊन हे प्रमाण ३० टक्क्यांवरून २०१९ मध्ये ७ टक्क्यांवर आले. २०१९ मध्ये तृणमूल आणि भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली. म्हणजे माकपची मते भाजपलाही मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत मते भाजपकडे कायम राहतील का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या दोन वर्षांत माकपच्या तरुण कार्यकत्र्यांचा लोकांमध्ये वावर वाढलेला आहे आणि या तरुणांना उमेदवारीही मिळाली आहे. तसेच, संयुक्त मोर्चामध्ये अब्बास सिद्दिकी यांचा ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा पक्षही सामील झाला आहे. दक्षिणेकडे सिद्दीकी यांचा प्रभाव असल्याने मुस्लीम मते मोर्चाला मिळू शकतील. या वेळी डाव्यांच्या मतात वाढ होऊ  शकेल. समजा, या मतांमध्ये पाच-दहा टक्क्यांची वाढ झाली, तर अनेक मतदारसंघांमध्ये तिहेरी लढाई होईल. हे पाहता मतदारांचा संयुक्त मोर्चाला मिळणारा प्रतिसाद निकालावर परिणाम करणारा ठरू शकेल, असा युक्तिवाद भट्टाचार्य यांनी केला.

पश्चिम बंगालच्या अटीतटीच्या लढाईत सत्ता स्थापनेचे कोणते पर्याय असू शकतात, या प्रश्नावर भट्टाचार्य म्हणाले, की तृणमूल काँग्रेसचा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसत नाही. भाजपलाही लाट निर्माण करता आलेली नाही. समाजमाध्यमांतून भाजपने तयार केलेले मोठ्या विजयाचे चित्र वास्तवात दिसेलच असे नाही. अशा परिस्थितीत तृणमूल काँग्रेस साध्या बहुमतापर्यंत पोहोचला, तर संयुक्त मोर्चाची मदत घेऊन सत्ता कायम ठेवता येईल. पण, सत्ता स्थापन करण्याची थोडी जरी आशा भाजपला दिसू लागली, तर मात्र भाजप कसोशीने आणि विविध मार्गाने प्रयत्न करेल. भाजपकडे संघटनेची ‘ताकद’ आणि निधी पुरवण्याची क्षमता आहे!

तृणमूल काँग्रेसचा प्रमुख विरोधक होण्याइतकी धाव भाजपने कशी घेतली, या प्रश्नाचे विश्लेषण करताना भट्टाचार्य म्हणाले, की डाव्या पक्षांचा ºहास होत गेला आणि त्यांच्या मतदारांची तृणमूलवरील नाराजी वाढत गेली. त्यांना भाजप हा पर्याय वाटू लागला. पश्चिम बंगालच्या बाहेर लोकांना ममता बॅनर्जी या लोकशाहीवादी आणि संघराज्यवादाच्या पाठिराख्या वाटत असल्या, तरी राज्यात मात्र त्यांची प्रतिमा वेगळी आहे. ममता या अधिकारवादी असून त्यांना विरोध सहन होत नाही. विरोधकांचे अधिकाधिक खच्चीकरण करण्याकडे त्यांचा कल असतो. २०१८ मध्ये पंचायत निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान न होताच तृणमूल काँग्रेसला ३४ टक्के मते मिळाली. तृणमूलचा हा आक्रमकपणा लोकशाहीविरोधी होता. परिणामी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या मतदारांनी भाजपला मते दिली. पश्चिम बंगामध्ये शिरकाव करण्याची ही संधी लक्षात घेऊन भाजपने गेली दोन वर्षे रणनीती आखली.ध्रुवीकरणाचा भाजपला काही प्रमाणात फायदा होऊ  शकतो, असे मतही भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. हिंदू-मुस्लीम विभाजनाचा मुद्दा भाजपने प्रचारात आणला, पण त्याचबरोबर दलित, मतुआ, सवर्ण असे जात आणि वर्गीय विभाजनही केले. पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारी, आर्थिक विकास, हेही मुद्दे महत्त्वाचे ठरू लागले आहेत.

सहाव्या टप्प्यात हिंसाचार

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९.०९ टक्के मतदानाची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात गुरवारी झालेल्या मतदानात हिंसाचाराच्या तुरळक घटना, पोलिसांचा गोळीबार व एका उमेदवार हल्ला यांचे गालबोट लागले.

निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार, सहाव्या टप्प्यात निवडणूक घेण्यात आलेल्या ४३ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९.०९ टक्के मतदान झाले. उत्तर २४ परगणा जिल्ह््यातील १७, नदिया व कृष्णनगर जिल्ह््यांतील प्रत्येकी नऊ आणि पूर्व वर्धमान जिल्ह््यातील आठ जागांचा यात समावेश होता.

गुरुवारी झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक ८२.६७ टक्के मतदान नदिया जिल्ह््यात झाले. त्याखालोखाल पूर्व वर्धमान (८२.१५), उत्तर दिनाजपूर (७७.७६) व उत्तर २४ परगणा (७५.९४ टक्के) अशी मतदानाची नोंद झाली.

उत्तर २४ परगण्यातील बागदा येथे सुमारे २५० लोकांच्या जमावाने एका मतदान केंद्राबाहेर सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा तेथे पाठवण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. यात एक जण जखमी झाला. बागदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व एक शिपाई या हल्ल्यात जखमी झाले. निवडणूक आयोगाने या घटनेबाबत अहवाल मागवला आहे.

लगतच्या अशोकनगर येथील एका घटनेत तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकत्र्यांमध्ये चकमकी उडाल्या व त्यात एकमेकांवर बॉम्ब फेकण्यात आले. अज्ञात लोकांनी एका वाहनाचे नुकसानही केले.

पूर्व वर्धमानमधील केटुग्राम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मथुरा घोष यांच्यावर कथितरीत्या तृणमूलच्या कार्यकत्र्यांनी एका मतदान केंद्राबाहेर हल्ला केला व त्यांच्या वाहनाची मोडतोड केली.