‘रोझ व्हॅली’ प्रकरणात अटकेनंतर दोन वेळा खासदार  

प्रसिद्ध बंगाली अभिनेते व माजी तृणमूल काँग्रेस खासदार तपस पॉल यांचे मंगळवारी मुंबई येथील रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

पॉल यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जानेवारीत ते मुलीला भेटण्यासाठी मुंबईत आले होते. कृष्णनगर मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार होते. सीबीआयने रोझ व्हॅली घोटाळ्यात अटक केल्यानंतर ते डिसेंबर २०१६ मध्ये चित्रपटातून राजकारणाकडे वळले होते. त्यांच्या पश्चात कन्या सोहिनी व पत्नी नंदिनी असा परिवार आहे. साहेब, अमर बंधन यांसारखे त्यांचे चित्रपट गाजले. त्यांचा जन्म हुगळी जिल्ह्य़ातील चंदननगर येथे झाला. त्यांनी हुगळी मोहसीन कॉलेजमधून पदवी घेतली.

नंदिनी पॉल यांनी सांगितले की, तपस यांना १ फेब्रुवारी रोजी ते अमेरिकेत उपचारासाठी जात असताना मुंबई विमानतळावर कोसळल्याने रुग्णालयात दाखल केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

इ.स. २००० मध्ये तपस पॉल यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता नंतर अलिपोर मतदारसंघातून ते आमदार झाले. २००९ पासून दोनदा ते कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. रोझ व्हॅली प्रकरणात त्यांना अटक झाली होती. त्यावेळी पक्षाने विचारपूसही केली नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. नंतर ते जामीनावर सुटले आणि सक्रिय राजकारणातून माघार घेतली.

‘साहेब’साठी फिल्मफेअर 

दादार कीर्ती या चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली नंतर पर्बत प्रिया, भालोबाशा भालोबाशा, अनुरागेर छोयान, अमर बंधन हे चित्रपट त्यांनी केले. हिरेन नाग यांच्या अबोध या चित्रपटात त्यांनी माधुरी दीक्षित नेने यांच्यासमवेत भूमिका केली. साहेब या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.