केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) बंगाली चित्रपटाची गायिका मुनमुन हुसेन बरूआ हिला अटक केली आहे. बेंगळुरू येथील केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामानाचे स्क्रीनिंग करताना दुसऱ्या एका प्रवाशाच्या हँडबॅगमधून २४,५०० रूपयांची चोरी केल्याचा मुनमुनवर आरोप आहे. ३० वर्षीय मुनमुन कोलकात्याला राहते.

शनिवारी चित्रा भवानी बेंगळुरूवरून मुंबईकडे जाणाऱ्या इंडिगो विमानातून प्रवास करत होत्या. चित्रा मुंबईला उतरल्या आणि त्यांनी सीआयएसएफकडे आपल्या बॅगमधून २४,५०० रूपयांची चोरी झाल्याची तक्रार केली होती.

तक्रार दाखल होताच सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ अलर्ट जारी केला. सीआयएसएफचे निरीक्षक रवींद्र जे यांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. एक महिला सामानाचे स्क्रीनिंग करत असताना चित्रा यांच्या हँडबॅगमधून पैसे चोरताना दिसली. ती चोरी करणारी महिला ही बंगाली गायिका मुनमुन हुसेन बरूआ असल्याचे नंतर तपासात उघड झाले.

मुनमुन त्याच दिवशी बेंगळुरूवरून एअर एशिया विमानाने हैदराबादला जात होती. तिच्या परतीचे तिकीट सोमवारचे होते. सोमवारी ती बेंगळुरू विमानतळावर उतरताच तिला अटक करून कर्नाटक पोलिसांकडे सोपवण्यात आले. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांकडून मुनमुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेजही देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुनमुनने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पहिल्यांदाच आपण असे केले असून यापुढे कधीही कोणताही गुन्हा करणार नसल्याचे सांगत मुनमुनने माफी मागितली आहे. मुनमुनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.