केरळच्या कोची शहरात रविवारी हदय हेलावून टाकणारी घटना घडली. येथील मदुक्कराई टोलनाक्याजवळ एका गाडीने पेट घेतल्यामुळे एका व्यापाऱ्याचा त्याच्या पत्नी व मुलादेखत मृत्यू झाला. दिलीप कुमार असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो बंगळुरूत राहत होता. ज्वेलरीचा व्यवसाय करणारे दिलीप कुमार रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबासोबत कोची येथे जात होते.

मदुक्कराई टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या इंजिनातून धूर येऊ लागला आणि गाडीने पेट घ्यायला सुरूवात केली. तेव्हा दिलीप कुमार यांनी चपळाई दाखवत आपल्या पत्नी आणि मुलाला गाडीबाहेर ढकलले. मात्र, आपला सीटबेल्ट वेळेवर काढता न आल्यामुळे दिलीप कुमार गाडीतच अडकले. तोपर्यंत संपूर्ण गाडीला ज्वाळांनी वेढले होते. त्यानंतर पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांदेखत दिलीप कुमार अक्षरश: जिवंत जळाले. सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात चेन्नईत कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदिता यांचाही अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. त्यांची गाडी झाडावर आदळल्यानंतर गाडीने पेट घेतला होता. त्यानंतर दोघेही गाडीतून बाहेर पडू शकले नव्हते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.