व्यवसायानिमित्त बंगळुरुत आलेल्या चीनच्या नागरिकावर पाच जणांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात चिनी नागरिक जखमी झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमध्ये राहणारे यान यांचा व्यवसाय असून बंगळुरुत एका करारानिमित्ताने ते आले आहेत. शनिवारी त्यांची करारावर शिक्कामोर्तब करणारी एक बैठकही झाली. इंदिरानगर येथे टॅक्सीची वाट बघत असताना बाईकवरुन आलेल्या पाच जणांनी यान यांना मारणाह केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोरांनी यान यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. हल्लेखोरांनी यान यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरण्याचा प्रयत्नही केला. मात्र यानच्या प्रतिकारामुळे हल्लेखोर पळून गेले. शेवटी यान यांनी मदत मागितली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. यानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. यानच्या चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

चिनी नागरिकावरील हल्ल्यानंतर बंगळुरुमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बंगळुरुमध्ये यापूर्वीही परदेशी नागरिकांवर हल्ले झाले आहेत.