बंगळुरुतील दक्षिण बंगळुरू या मतदारसंघातून भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शहरातील दक्षिण विभागात असणाऱ्या बीबीपीएम येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गेलेल्या सूर्या आणि भाजपाच्या इतर काही नेत्यांनी या केंद्रामध्ये एका विशिष्ट समाजाचे कर्मचारीच कसे नियुक्त करण्यात आले असा प्रश्न येथील व्यवस्थापनाला विचारल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेजस्वी सूर्या यांच्यावर सोशल नेटवर्किंगवरुन टीका केली जात असून करोनाविरुद्धच्या युद्धाला सूर्या जातीयवाद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.

बंगळुरु दक्षिण मतदारसंघातील खासदार असणाऱ्या तेजस्वी सूर्या यांच्या युट्यूब चॅनेलवरुन त्यांनी करोना केंद्राला दिलेल्या भेटीचा व्हिडीओ लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येत होता. या व्हिडीओमध्ये सूर्या १७ जणांच्या नवाची यादी वाचून दाखवताना दिसत आहे. ही सर्व नावं मुस्लीम व्यक्तींची असल्याचे नावांवरुन स्पष्ट होतं. त्यानंतर सूर्या येथील प्रमुख अधिकाऱ्याला, “या लोकांची नियुक्ती कोणी केली?” असा प्रश्न विचारताना व्हिडीओत दिसतात. अशाच प्रकारे सूर्या यांच्यासोबत असणारे भाजपाचे आमदार सतिश रेड्डी, रवि सुब्रमण्य आणि उदय गारुडाचर हे देखील केंद्र प्रमुखांकडे या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रश्न विचारताना दिसत आहेत.

मात्र बीबीएपीच्या दक्षिण झोनच्या प्रमुख असणाऱ्या विशेष आयुक्त तुलसी माडीनेनी या व्हिडीओमध्ये भाजपा नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, “ज्यांनी येथील पदांसाठी अर्ज केला त्यांची नियुक्ती करण्यात आलीय,” असं सांगताना व्हिडीओत दिसतं. त्यानंतर भासवानागुडीचे आमदार सुब्रमण्य हे तुलसी यांना, “तुम्ही महापालिकेसाठी करोना केंद्रात भरती केलीय की मदरश्यासाठी?” असा प्रश्न विचारताना दिसतात. “तुमच्या चुकीच्या कामांसाठी आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. येथील बेड्स कोण बुक करत आहे याची माहिती आमच्याकडे आहे. तसेच या बुकींगसाठी किती पैसे घेतले जात आहेत हे ही आम्हाला ठाऊक आहे,” असं सुब्रमण्य सांगताना दिसतात. त्यानंतर भाजपा आमदार रेड्डी हे माडीनेनी यांना, “हे लोक जनतेला उत्तर देणार आहेत का?” असा प्रश्न विचारत जाणूनबुजून या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगताना व्हिडीओत दिसतात.

कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या नेत्यांनी घातलेला हा गोंधळ खरोखरच दुर्देवी आणि असंवेदनशील असल्याची टीका केलीय. मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकारमध्ये माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धरामय्या यांनी, “कर्मचाऱ्यांची यादी वाचून दाखवल्यानंतर तेजस्वी सूर्या आणि भाजपाचे आमदार या कर्मचाऱ्यांची नियुक्ती मदरसा चालवण्यासाठी झालीय का असं विचारत आहेत. कन्नडी लोक इथे विचारु इच्छितात की येडीयुरप्पा, त्यांचे मंत्रीमंडळ, आमदार आणि खासदार हे काय इथे हिंदू स्मशानभूमी चालवण्यासाठी निवडून दिले आहेत का?,” असा प्रश्न विचारला आहे.

सिद्धरामय्या यांनी नंतर ट्विटरवरुन टीका करताना, “भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या प्रकरणाला जातीय वळण देणं हे दुर्देवी आणि असंवेदनशील आहे. अगदी अन्नपदार्थांपासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींमध्ये भाजपाला समजातील काही घटकांना लक्ष्य करुन राजाकारण करायचं आह,” असं म्हटलं आहे.

राज्यसभेचे खासदार सय्यद नासिर हुसैन आणि ऑल इंडिया कॉग्रेस कमिटीचे प्रवक्ते ब्रिजेश कालप्पा यांनी बीबीएमपीच्या दक्षिण झोनमधील करोना वॉर रुममध्ये काम करणाऱ्या सर्व २०५ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपा नेत्यांनी मुद्दाम या यादीमधील १७ मुस्लीम व्यक्तींचीच नावं वाचून दाखवण्याचा आरोप कलप्पा यांनी केलाय. सूर्या यांनी संपूर्ण यादीमधील काही नावं वगळून मुद्दाम मुस्लीम नावं वाचल्याचं कलप्पा यांनी म्हटलं आहे. #TejasviSuryaExposed आणि #DiaperSuryaExposed हे हॅशटॅग ट्रेण्ड होतानाही ट्विटरवर दिसून आलं.

याप्रकरणामध्ये स्थानिक वकील विनय श्रीनिवास यांनी बंगळुरु शहर पोलीस आय़ुक्त कमल पंत यांच्याकडे भाजपा नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय. “कलम १५३ अ आणि २९५ अ तसेच ५०५ (२) अंतर्गत या नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे. केवळ १७ मुस्लीम कर्मचाऱ्यांनी नावं वाचून या प्रश्नाला जातीय वळण देऊन एकमेकांविरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केलाय,” असं श्रीनावस म्हणाले.

दरम्यान मंगळवारी बंगळुरु पोलिसांनी पैसे घेऊन बेड बुकिंग करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या स्टींग ऑप्रेशनमध्ये या बेड बुकींग स्कॅमचा खुलासा झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.