करोना रुग्णांवर उपचार करताना व्हायरसची लागण झालेल्या एका डॉक्टरचा गुरुवारी बंगळुरुच्या बीएमसीआरआय रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टर मंजुनाथ एसटी असे त्यांचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंजुनाथ स्वत: डॉक्टर असूनही त्यांना तीन रुग्णालयांनी अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार दिला.

कनकपुरा तालुक्यातील चिक्कमुडावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ च्या ड्युटीवर असताना त्यांना करोनाची लागण झाली. करोनामुळे मृत्यू झालेले डॉक्टर मंजुनाथ कुटुंबातील दुसरे सदस्य आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सासऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

“२५ जूनला डॉ. मंजुनाथ यांना ताप आला व श्वासोश्वास करताना त्यांना त्रास होऊ लागला. मंजुनाथ यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसत होती. पण रिपोर्ट मिळाला नव्हता. आम्ही स्वत: डॉक्टर असूनही तीन रुग्णालयात मंजुनाथ यांना बेड मिळवून देऊ शकलो नाही. करोना चाचणीचा रिपोर्ट नसल्यामुळे तिन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला” अशी माहिती डॉ. नागेंद्र कुमार यांनी दिली.

“रुग्णालय अ‍ॅडमिट करुन घेत नसल्यामुळे अखेर त्यांना रस्त्यावर बसावे लागले. अखेर कुमास्वामी लेआऊट येथील एका हॉस्पिटलने त्यांना दाखल करुन घेतले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. अखेर ९ जुलै रोजी मंजुनाथ यांना बीएमसीआरआय रुग्णालयात दाखल केले. ते व्हेंटिलेटरवर होते. मंजुनाथ यांना फिजियोथेरपिस्टच्या मदतीची गरज होती. पण एकही फिजियोथेरपिस्ट पीपीई किट घालून ICU मध्ये यायला तयार झाला नाही. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला” असे नागेंद्र कुमार यांनी सांगितले.

डॉ. मंजुनाथ यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. यात त्यांची डेनटिस्ट पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. आम्ही डॉक्टर असल्यामुळे आम्हाला या सर्वातून जावे लागतेय अशी खंत नागेंद्र यांनी बोलून दाखवली.