कर्नाटकमधील बंगळुरु शहरामधील करोना वॉर्डमधून एक रुग्ण पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण एका खूनच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अरोपी असून त्याने दारु पिण्यासाठी रुग्णालयामधून पळ काढण्याचे समजते. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीला दारुचे व्यसन असून तो पळून गेल्यानंतर त्याने त्याच्या मित्राला दारुची व्यवस्था करण्यासंदर्भात संपर्क केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या आरोपीला पोलिसांनी १९ जून रोजी खून प्रकरणात अटक केली होती. या व्यक्तीने स्वत:च्याच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नव्या नियमांनुसार अटक करण्यात आल्यानंतर या आरोपीची करोनाचा चाचणी करण्यात आली. मंगळवारी या चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यानंतर या व्यक्तीला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचबरोबर या आरोपीला अटक करणाऱ्या पोलिसांनाही क्वारंटाइन करण्यात आलं.

बुधवारी सकाळी या आरोपीच्या हाताला जखम झाल्याच्या त्यावर उपचार करण्यासाठी त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यात आलं. करोना वॉर्डमधून बाहेर पडून दुसऱ्या वॉर्डमध्ये जाताना या आरोपीने नर्स आणि सुरक्षा रक्षकांना धक्का देऊन रुग्णालयातून पळ काढला. या आरोपीने दुसऱ्या वॉर्डमध्ये जाण्यासाठी पीपीई कीट घातल्याने मुख्य गेटवरही त्याला सुरक्षा रक्षकांनी अडवले आहे. त्यानंतर या व्यक्तीने पुढे जाऊन रुग्णालयाभोवतीच्या संरक्षक भिंतीवरुन उढी मारुन पळ काढला. बंगळूरु मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टीट्यूटच्या नोडल अधिकारी डॉक्टर सुमिता सेगू यांनी ही माहिती दिली.

करोना रुग्ण पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. यासंदर्भातील माहिती रुग्णालय प्रशासनाने व्ही. व्ही पूरम पोलीस स्थानकामध्ये कळवली. या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक टीम करुन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान या आरोपीने त्याच्या मित्राला फोन केल्याची माहिती समोर आली. दारु विकत घेण्यासाठी मदत करण्यासंदर्भात आरोपीचा फोन आल्याची माहिती आरोपीच्या मित्रानेच पोलिसांना दिली. दोघांनी भेटण्याच्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी हा करोना रुग्ण असल्याचे समजल्याने त्याच्या मित्राने पोलिसांनी माहिती दिल्याचे समजते.