डेटिंग साईटसवर महिला असल्याचे भासवून दोन तरुणांना जाळयात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामटयाला बंगळुरु गुन्हे शाखेने अटक केली आहे. सागर राव (२५) असे आरोपीचे नाव आहे. महिला असल्याचे भासवून सागर जवळपास १० पुरुषांसोबत चॅटिंग करत होता असे पोलिसांनी सांगितले. सागरकडे मिमिक्रीची कला आहे. तो अगदी सहजपणे महिलांचा आवाज काढून कुठल्याची पुरुषाला भुलवण्यामध्ये पारंगत आहे.

ज्या दोन तरुणांनी सागरच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांना सागरने हजारो रुपयांना फसवले आहे. सागर राव व्हाईटफिल्ड विनायका लेआऊट येथे राहतो. तो उलसूर येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन आणि सहा सीमकार्ड जप्त केले आहेत.

महिलांच्या नावाने डेटिंग साईटसवर नोंदणी केल्यानंतर सागर पुरुषांसोबत मैत्री करायचा. शिल्पा, सोनिया जैन, मनिषा जैन आणि रश्मी अशी नावे त्याने धारण केली होती. सागर स्वत:चा मोबाईल नंबर देऊन पुरुषांना जाळयात ओढायचा. अनेकदा तो स्वत:हून फोन करायचा. गोडी गुलाबीने बोलून प्रेमाच्या जाळयात ओढल्यानंतर तो त्याच्या अकाऊंटवर पैसे पाठवायला सांगायचा असे पोलिसांनी सांगितले.

माझी आई आजारी आहे तिच्यावर ऑपरेशनसाठी तात्काळ १लाख रुपयांची गरज आहे असे भावनिक कारण सांगून तो समोरच्याला पैसा देण्यासाठी राजी करायचा. सागरच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाने त्याला ऑनलाइन ७१ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. पैसे खात्यात जमा झाल्यानंतर सागरचा फोनच नॉट रिचेबल झाला म्हणून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.