४० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर करत प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरणारा ड्रग सप्लायर बेंगळुरु पोलिसांच्या जाळ्यात अडकला. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती त्याने दिली नव्हती. यामुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला.

रच्चमा रंगा हा १२ वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात बेंगळुरुत आला. सुरुवातीला तो बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करु लागला. २०१३ पासून तो अमली पदार्थांची विक्री करु लागला. हळूहळू त्याने शहरात स्वतःचे जाळेच तयार केले. यानंतर त्याने अमली पदार्थाच्या विक्रीसाठी काही तरुणांना नेमले. यातून तो कोट्यवधी रुपये कमवत होता. कनकपूरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटमध्ये तो राहत असून यासाठी तो महिन्याला ४० हजार रुपये भाडे मोजतो. त्याच्याकडे एक चार चाकी कार आणि गावी संपत्ती देखील आहे.

काही महिन्यांपूर्वी त्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरले होते. यात त्याने उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले नव्हते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी देखील केली. यात त्याने कंत्राटदार म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. आयकर विभागातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. २० जानेवारीला कोरमंगलम येथे रंगा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रंगा आणि त्याचा साथीदार श्रीनिवास यांना अटक केली. तर त्यांचा आणखी एक साथीदार तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी रचप्पा रंगाकडून ५ लाख रुपयांची रोकड, २६ किलो गांजा जप्त केला आहे. बेंगळुरुत रचप्पा रंगा महिन्याला सुमारे ३० किलो गांजा विकतो, असे सूत्रांनी सांगितले. या गांजाची किंमत प्रति किलो ३५ ते ४० हजार रुपये इतकी आहे.