प्रेमासाठी वाटेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. प्रेम मिळवण्यासाठी सारे काही सोसायची, भोगायची त्यांची तयारी असते. पण गुन्हा केला तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल. प्रेयसीच्या उपचारासाठी खर्च येणारा पैसा जमवण्यासाठी चोरी करणाऱ्या प्रेमवीराला अशीच शिक्षा भोगावी लागली आहे. पैसे जमवण्यासाठी चोर बनलेल्या या प्रियकराला बेंगळुरू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रियकराने एक-दोन नव्हे तर तब्बल ५१ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे.

मनोहर उर्फ मनू असे अटक केलेल्या या चोराचे नाव आहे. एका कपड्याच्या कंपनीत तो काम करत होता. त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीसोबत त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्न करून संसार थाटण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली होती. अचानक त्याची प्रेयसी आजारी पडली. यावर्षी जानेवारीत ती आंध्र प्रदेशात गेली. उपचारासाठी तिला बेंगळुरूत आणायचे होते. उपचारावर ५ लाख रुपये खर्च येईल, असे एका डॉक्टरने मनूला सांगितले होते. त्यात प्रेयसीने त्याला बेंगळुरूत घर भाड्याने घ्यायला सांगितले होते. त्यासाठी पैशांची जमवाजमव करायची होती. टेलरचे काम करून एवढे पैसे मिळणार कसे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. अखेर त्याने चोरीचा मार्ग पत्करला. टेलरचा काम करणारा मनू आता अट्टल चोर बनला होता. शहरातील विविध भागांतून तो दुचाकी चोरायचा. त्याविषयी प्रेयसीला मात्र काहीही माहिती नव्हते. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मनूचे नाव समोर आले. पोलिसांनी सापळा रचला. एका कंपनीसाठी दुचाकी खरेदी करायच्या आहेत, अशी जाहिरात दिली. पोलिसांनी फेकलेल्या जाळ्यात मनू अलगद अडकला. त्याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून २५ लाख रुपये किंमतीच्या ५१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.