बंगळुरूत कार आणि मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पश्चिम विभागीय पोलिसांनी त्यांच्याकडून १५३ मोटरसायकली आणि सहा कार जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्यांपैकी एक तरुण गर्लफ्रेंडला लाँग ड्राइव्हला नेण्यासाठी महागड्या मोटरसायकली चोरी करायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याने आतापर्यंत १६ मोटरसायकली चोरल्या होत्या.

पोलीस आयुक्त टी. सुनील कुमार यांनी सांगितले, की “वाहनचोरी प्रकरणी ६० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात रंजित इलांगवान उर्फ वांदेल आणि त्याचा साथीदार मरिमुत्तु मुनिस्वामी उर्फ बाईक राजा या दोघांचा समावेश आहे. नापास झाल्याने दोघांनीही महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. त्यांनी जयनगर, जेपी नगर, विल्सन गार्डन, संपांगीरामनगर आणि बानाशंकरी परिसरातून तब्बल ८० लाख रुपये किंमतीच्या मोटरसायकली चोरल्या होत्या.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयनगर ब्लॉक चारमध्ये दोन तरुण स्टंट करत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहून ते दोघेही फरार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली. आपणच मोटरसायकलींची चोरी करत असल्याची कबुली दोघांनी दिली. मोटरसायकली चोरी करून त्यांचा वापर करायचो आणि त्यानंतर कुठेतरी पार्क करून निघून जायचो, असे त्यांनी चौकशीत सांगितले.

केजी नगर पोलिसांनीही वसीम अक्रम या २४ वर्षांच्या तरुणाकडून महागड्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. तो आपल्या गर्लफ्रेंडला लाँग ड्राइव्हला घेऊन जाण्यासाठी मोटरसायकलींची चोरी करायचा. वर्षभरापासून मोटरसायकली चोरत होता. त्या मोटरसायकलींवरून गर्लफ्रेंडला लाँग ड्राइव्हला घेऊन जायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.