बंगळुरुमधील आयपीएस अधिकारी भिमाशंकर गुलेड यांचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता टीपी शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भिमाशंकर यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एका महिलेचे चुंबन घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं. खाकी गणवेशात ते या व्हिडिओमध्ये दिसत असल्यानं हे प्रकरण गुलेड यांना चांगलंच भोवलं. संबंधित महिलेच्या पतीनं ही व्हिडिओ क्लिप समोर आणत आपल्या पत्नीला बळजबरीनं शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर केला. तसेच गुलेड यांच्याविरोधात कोरामंगला पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. तक्रार दाखल करताना ही व्हिडिओ क्लिप पोलिसांना पुरावा म्हणून त्यानं दिली होती. मात्र त्यानंतर ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या एका क्लिपमुळे पोलीस विभागाची चांगलीच नाचक्की झाली.

या प्रकरणामुळे भिमाशंकर यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली असा आरोपही अनेकांनी केला. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. महिलेचा पती सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. भिमाशंकर हे आपल्या स्टुडिओमध्ये यायचे आणि इथेच त्यांनी पत्नीशी मैत्री केली असाही आरोप तिच्या पतीनं केला आहे. महिलेचे चुंबन घेत असलेला व्हिडिओ स्वत: भिमाशंकर यांनीच सेल्फी कॅमेरातून चित्रित केला होता. या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या भिमाशंकर यांनी संबंधीत महिलेच्या पतीनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.