13 August 2020

News Flash

काही कळायच्या आतच मगरीने त्याचा हात खाल्ला!

सावधगिरी बाळगण्याचा फलक न पाहिल्याने घडली दुर्घटना

बंगळुरूमध्ये असलेल्या टर्टल शेल टेक्नॉलॉजी या कंपनीत सीईओ म्हणून काम करणाऱ्या मुदित दंडवते या तरूणावर मगरीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुदितला त्याचा डावा हात गमवावा लागला.  मुदित रामनगर जिल्ह्यात असलेल्या बनरघट्टा जंगलात फिरायला गेला होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आणि त्याचे दोन पाळीव कुत्रेही होते. हा सगळा भाग वनविभाच्या क्षेत्रात येतो. इतकेच नाही तर या ठिकाणी एक मंदिरही आहे. या मंदिरालाही मुदित आणि त्याच्या मित्रानी भेट दिली. त्यानंतर तिथल्या थत्तेकेरे तलावात आपल्या पाळीव कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी मुदित उतरला. तितक्यात टपून बसलेल्या मगरीने पाण्याबाहेर उडी मारत मुदितच्या डाव्या हाताचा लचका तोडला. तसेच त्याचा हात धरूनही ठेवला. या सगळ्या प्रकारामुळे आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुदित घाबरला. कशीबशी त्याने मगरीच्या तावडीतून आपली सुटका केली.

मुदितला त्याच्या मित्राने तातडीने होसमत रूग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला अति दक्षता विभागात ठेवण्यात आले. मुदितच्या डाव्या हाताच्या कोपराखालचा भाग मगरीने खाल्ला आहे. त्यामुळे तो जोडता येणे शक्यच नाही, त्याची जखम स्वच्छ करून आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत, असे डॉक्टर अजित रायन यांनी सांगितले. तसेच आता मुदितची तब्बेत ठीक असून त्याला अतिदक्षता विभागाच्या बाहेर आणले गेले आहे असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

मुदित दंडवते विरोधात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र मुदित आणि त्याच्या मित्रांनी कोणतीही संमती न घेता वनविभागाच्या परिक्षेत्रात प्रवेश केला. ज्या तलावात ते उतरले होते त्या तलावाबाहेर सावधगिरी बाळगण्याचे फलकही लावण्यात आले होते. मात्र मुदित आणि त्याच्या मित्रांनी कोणतेही नियम पाळले नाहीत. त्याचमुळे ही घटना घडली असे रामनगर पोलीस ठाण्याचे अधीक्षक बी रमेश यांनी म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अतिक्रमण केल्याचे प्रकरण दाखल केले आहे. वनविभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मुदित दंडवते हा मुळचा नागपूरचा आहे. तसेच त्याने आयआयटीतून इंजिनिअरींगचे शिक्षणही घेतले आहे. त्याला धोक्याच्या सूचनेकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे आपला हात गमवावा लागला. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. येत्या काही दिवसात त्याच्या हातावर आणखी एक शस्त्रक्रिया होईल आणि त्यानंतर त्याला कृत्रीम हात बसवण्यात येईल असे होसमत रूग्णलयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2017 8:48 pm

Web Title: bengaluru startup ceos arm bitten by crocodile
टॅग Loksatta,News
Next Stories
1 GST: संसदेच्या मध्यरात्रीच्या विशेष सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार ?
2 बिहारमध्ये राजकीय नाट्य; लालूंच्या मुलाने नितीश कुमारांना म्हटले ‘संधीसाधू’
3 ‘मीरा कुमार संयमी! हे तुमचेच बोल, विसरलात का सुषमाजी?’
Just Now!
X