बंगळुरुत एका महिलेला सलूनमध्ये ‘हेअर स्मुदनिंग’ करणे चांगलेच महागातत पडले. कारण हे केल्याने तिचे केस गळू लागले या घटनेनंतर महिलेने सलून आणि लोरियाल कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आणि १५ लाख रुपयांची भरपाई मागितली. ग्राहक न्यायालयाने गेल्या आठवड्यात या महिलेच्या बाजूने निकाल देत सलूनला ३१ हजारांचा दंड ठोठावला. मात्र लोरियाल या कंपनीविरोधातला दावा कोर्टाने फेटाळला आहे. निशा बटाविया असे या महिलेचे नाव आहे.

निशा बटाविया यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये जयनगर भागात असलेल्या सलून मध्ये हेअर स्मुदनिंग केले होते. त्यानंतर माझे केस रूक्ष झाले आणि तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर केस गळू लागले. निशा यांनी पुन्हा सलून गाठले आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला.

सलूनमधील एका हेअर स्पेशालिस्टने निशा बटाविया यांचे केस तपासले आणि त्यांना लोरियाल कंपनीची उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला. मात्र लोरियाल कंपनीची उत्पादने वापरल्याने केस गळण्याचे न थांबता आणि वेगाने गळू लागले. पाच वेळा ट्रिटमेंट देऊनही काहीही फरक पडला नाही. तेव्हा सलून आणि लोरियाल कंपनीच्या स्पेशालिस्टने निशा यांना डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. ज्यानंतर संतापलेल्या निशा यांनी १५ लाख रुपयांचा दावा ठोकत ग्राहक न्यायालयात तक्रार केली. मात्र कंपनीविरोधातला दावा कोर्टाने फेटाळून लावला आणि सलूनला ३१ हजारांचा दंड ठोठावला.