बंगळुरुमधील एका ५८ वर्षीय महिलेला फेसबुकवरुन ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाइन फूड ऑर्डर करताना या महिलेला हा गंडा घालण्यात आला. सविता शर्मा असं या महिलेचं नाव असून ती दक्षिण बंगळुरुमधील येल्लाचेन्नाहल्ली या भागात राहते. या महिलेने फेसबुकवर सर्फिंग करताना ऑनलाइन फूड डिलेव्हरीसंदर्भात एक जाहिरात पाहिली. अडचशे रुपयांची एक थाळी मागवा आणि एक मोफत मिळवा अशी ही जाहिरात होती.

पोलिसांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जाहिरातीमधील रेस्तराँचा पत्ता हा सदाशीवनगरचा होता. शर्मा यांनी या जाहिरातीमधील क्रमांकावर फोन केला आणि आपल्याला थाळी ऑर्डर करायची असल्याचे सांगितले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला थाळीची ऑर्डर बूक करण्यासाठी १० रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावं लागेल असं सांगितलं. आता १० रुपये भरुन उरलेले पैसे तुम्ही जेवण घरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे कॅश ऑन डिलेव्हरी पद्धतीने देऊ शकता, असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं.

त्यानंतर शर्मा यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर एक फॉर्म होता. या फॉर्ममधील माहिती भरताना शर्मा यांनी आपला डेबिट कार्ड क्रमांक आणि पिन नंबरही शेअर केला. पुढील काही मिनिटांमध्ये शर्मा यांच्या खात्यातून ४९ हजार ९९६ रुपये काढून घेण्यात आले. खात्यामधून पैसे काढून घेण्यात आल्याचा मेसेज शर्मा यांना त्यांच्या मोबाईलवर आला. शर्मा यांनी पुन्हा त्या जाहिरातीमधील क्रमांकावर फोन केला असता तो स्वीच ऑफ येत होता. हा सर्व प्रकार गुरुवारी घडला. या संदर्भात आता शर्मा यांनी सायबर क्राइम युनिटकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला पीन क्रमांक फोन वरुन शेअर करु नये असं बँकांकडून अनेकदा सांगितलं जात असतानाही अशाप्रकारे लोकं ऑनलाइन प्रलोभनांना बळी पडून सायबर चोरांच्या जाळ्यात अडकतात. बँकांचे पासवर्ड, पीन नंबर, सीव्हीही क्रमांक कधीच फोनवरुन कोणाही शेअर करु नये. अगदी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही हे क्रमांक सांगू नयेत असं अनेक जनहितार्थ जारी करण्यात आलेल्या सायबर सुरक्षेच्या जाहिरातींमध्ये सांगितलं जातं.