वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर एखादी गोळी घेऊन अनेकजण सुटका करून घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा गोळ्यांच्या अतिसेवनामुळे गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची शक्यता असते. कधीकधी यातून मृत्यूही संभवतो. बंगळुरूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. डोकं दुखीचा त्रास थांबावा म्हणून एका महिलेने तब्बल १५ गोळ्यां घेतल्या. परिणामी औषंधीच्या व्हरडोसमुळे त्या महिलेला प्राण गमावावे लागले.

बंगळरूमधील ४५ वर्षीय अनुसुयम्मा या महिलेचा डोकेदुखीमुळे व्हिक्टोरिया रूग्णालयात मृत्यू झाला. अनुसुयम्माला मागील १५ वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास होत आहे. या आजारावर तिचा उपचार सुरू होता. शनिवारी अचानक अनुसुयम्माला डोकेदुखीचा त्रास वाढला. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अनुसुयम्माने एकत्र १५ गोळ्यांचं सेवन केलं. गोळ्या खाल्ल्यानंतर अनुसुयम्मा बेशुद्ध पडली.

मुलीने उपचारासाठी तात्काळ अनुसुयम्माला स्थानिक रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी परिस्थिती पाहून प्राथमिक उपचार केल्यानंतर व्हिक्टोरिया रूग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर अनुसुयम्माला बंगळरूतील व्हिक्टोरिया रूग्णालायत भर्ती केलं. अखेर सोमवारी अनुसुयम्मचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

दरम्यान, डोकेदुखी हा आजार नसून आजारामागील कारण आहे. त्यामुळे वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर एखादी गोळी घेऊन तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी त्यामागील कारण किंवा आजार शोधून त्या दृष्टीने उपचार सुरू केलेले केव्हाही चांगले. डोकेदुखी हे किरकोळ लक्षण वाटत असले तरी वेळीच त्यावर उपचार  केला नाही तर डोकेदुखीची तीव्रता वाढू शकते. मात्र वेळीच उपचार घेतल्यास गंभीर आजाराची लागण टाळता येऊ  शकते.