लक्झरी वस्तू बनवणारी कंपनी LVMHचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वोच्च स्थानी अमेझॉनचे मालक जेफ बेजोस दुसऱ्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट तर तिसऱ्या स्थानी बिल गेट्स विराजमान आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. या इंडेक्समध्ये सहभागी असलेल्या जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यानंतर दररोज अद्ययावत केली जाते.

या यादीनुसार, बर्नार्ड अनरॉल्ट (वय ७०) यांची संपत्ती ७.४५ लाख कोटी रुपये इतकी झाली. एलव्हीएचएम कंपनीच्या शेअर्समध्ये १.३८ टक्के तेजी आल्याने मंगळवारी त्यांची संपत्ती १०८ अब्ज डॉलर (७.४५ लाख कोटी) इतकी झाली होती. तर बिल गेट्स यांची संपत्ती १०७ अज्ब डॉलर (७.३८ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.

बिल गेट्स हे सात वर्षांत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. या इंडेक्सनुसार, या वर्षी बर्नार्ड यांच्या संपत्तीत सर्वाधिक ३९ अब्ज डॉलरची (२.६९ लाख कोटी) वाढ झाली आहे. बर्नाल्ड यांची संपत्ती ही फ्रान्सच्या जीडीपीच्या ३ टक्क्यांइतकी आहे. गेल्या महिन्यांत बर्नार्ड हे सेंटीबिलेनिअर कँपमध्येही सामील झाले होते. यामध्ये जगातील केवळ तीनच व्यक्ती आहेत त्या म्हणजे जेफ बेजोस, बिल गेट्स आणि बर्नाल्ड अरनॉर्ल्ट.

बर्नार्ड यांच्याजवळ एलव्हीएमएच कंपनीचे सुमारे ५० टक्के शेअर्स आहेत तर फॅशन हाऊस ख्रिश्चिअन डायरचे सुमारे ९७ टक्के शेअर्स आहेत. फ्रान्सच्या ऐतिहासिक नोट्रेडेम कॅथेड्रल चर्चमध्ये आग लागल्याने चर्चचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या चर्चच्या उभारणीसाठी बर्नार्ड आणि त्यांच्या कुटुंबाने ६५ कोटी डॉलरची मदत केली होती. तर बिल गेट्स यांनी आजवर ३५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे. तर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी आपल्या पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटावेळी तडजोडीसाठी ३६.५ अब्ज डॉलरचे शेअर दिल्यानंतरही ते श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहेत.