वॉशिंग्टन, अलास्का व हवाईत पराभव; सँडर्स यांच्याकडून धक्का
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्लिंटन यांना अलास्का, वॉशिंग्टन व हवाई येथील निवडणुकीत बेर्नी सँडर्स यांनी दणका दिला, त्यांनी हिलरी क्लिंटन यांची आघाडी कमी करण्यात पहिल्यांदा मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे क्लिंटन यांना धोक्याचा इशारा मिळाल्याचे बोलले जाते. सँडर्स यांनी वॉशिंग्टनमधील लढत ७२ टक्के मते मिळवूनजिंकली आहे. अलास्कात त्यांना ८० टक्के मते मिळाली, तर हवाईतही त्यांनी क्लिंटन यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.
क्लिंटन यांनी घोडदौड सुरू ठेवली असली तरी वॉशिंग्टनमध्ये झालेला पराभव त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. बोइंग, मायक्रोसॉफ्ट, स्टारबक या कंपन्या असलेल्या वॉशिंग्टन राज्यात शंभर प्रतिनिधी असून त्यांनी सँडर्स यांच्या पारडय़ात मते टाकली आहेत. सँडर्स यांनी विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथे व्हेरमाँटचे सिनेटर असलेल्या सँडर्स यांनी सांगितले, की पश्चिमेकडे मार्गक्रमण करताना परिस्थिती सुधारत जाईल. आम्ही क्लिंटन यांची आघाडी मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. विजयाच्या दिशेने ही वाटचाल आहे. हिलरी क्लिंटन त्यांचे पती बिल क्लिंटन व कन्या चेल्सी क्लिंटन यांनी वॉशिंग्टनमध्ये मुक्काम ठोकला होता, तरी काही उपयोग झाला नाही. अलास्कात सँडर्स यांच्या पत्नीने प्रचार केला होता व तेथे एकूण १६ प्रतिनिधी आहेत. मी उमेदवारी जिंकू शकत नाही किंवा अध्यक्षीय निवडणूकजिंकू शकणार नाही असे मुळीच नाही. आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत असे सँडर्स यांनी सांगितले.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी क्लिंटन किंवा सँडर्स यांना एकूण ४७६३ सदस्यांपैकी २३८२ मते आवश्यक आहेत. यात ७१२ हे महाप्रतिनिधी असतात ते निष्पक्ष असतात व ते कुणाही उमेदवाराला मत देऊ शकतात. क्लिंटन यांना १७०३ मते मिळाली असून, त्यात प्राथमिक फेरीतील १२३४ मतांचा समावेश आहे, तर ४६९ महा प्रतिनिधी (सुपर डेलिगेट्स) त्यांच्या बाजूने आहेत. सँडर्स यांना ९८५ प्रतिनिधी मते मिळाली असून, २९ महाप्रतिनिधींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
वॉशिंग्टन व अलास्का हे सँडर्स यांना अनुकूल होते, कारण तेथे ग्रामीण व श्वेतवर्णीय लोक जास्त आहेत. क्लिंटन यांनी वॉशिंग्टन येथे चांगला प्रचार केला होता. विस्कॉन्सिन हा सँडर्स यांना अनुकूल भाग असून, तेथे ५ एप्रिलला मतदान होईल. न्यूयॉर्क क्लिंटन यांना अनुकूल असून तेथे २४७ सदस्य आहेत तेथे १९ एप्रिलला निवडणूक होईल. पेनसिल्वानिया, कनेक्टिकट, डेलावर, ऱ्होड बेटे, मेरीलँड येथे मतदानात २६ एप्रिल रोजी क्लिंटन यांना अनुकूलता असू शकते. तेथे ४०० मते आहेत.