भारतीय कंपन्यांना देशातील बुद्धिवान कर्मचाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यात यश न आल्यामुळे  तसेच म्हणावे तसे उत्पादन झालेले नाही. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेला ५३ हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
लिंकेडिन आणि पीडब्लूसी यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. भारतीय कंपन्यांनी योग्य वेळी बुद्धिवान कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत घेतले असते आणि त्यांना संधी दिली असती तर ५० हजार ८०० कोटी रुपयांची उत्पादन वाढ झाली असती. मात्र परिस्थिती तशी नसल्यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे.
लिंकेडिन आणि पीडब्लूसी यांनी संयुक्तपणे ११ देशांच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जगात वेगाने विस्तारणाऱ्या आणि मोठय़ा बाजारपेठ म्हणवणाऱ्या भारताचा क्रमांक शेवटून दुसरा तर चीनचा शेवटचा क्रमांक लागला आहे. भारताला ३४ गुण मिळाले आहेत. चीनला २३ गुण मिळाले आहेत. या सर्वेक्षणानुसार पहिला क्रमांक नेदरलॅण्डने पटकावला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन, कॅनडा, सिंगापूर, अमेरिका,  ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी आणि ब्राझील यांचे क्रमांक लागतात. पीडब्लूसीच्या पद्मजा अलगनंदन यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील कमी विविधता, योग्य गुंतवणूक आणि कौशल्यवाढीचा अभाव, धोरणाचे अडथळे आणि विकासाचा दर यांच्या अभावामुळे भारतासारख्या देशातील गुणवत्ता योग्य तऱ्हेने बहरली नाही.

पश्चिमेकडील नोकऱ्यांसाठी भारतीय नागरिक आता अनुत्सुक?
जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अनिश्चितता, नोकऱ्यांमधील असुरक्षा आणि पुढील भवितव्याच्या धास्तीने पाश्चात्त्य देशांमध्ये नोकऱ्या मिळविण्यास भारतीय नागरिक आता अनुत्सुक झाले असून उच्च प्रशिक्षित क्षमतेचे हुशार भारतीय नागरिक आता चांगल्या संधीच्या अपेक्षेने पुन्हा मायदेशी परतत असल्याचा निष्कर्ष एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या अभ्यासावरून काढण्यात आला आहे. अर्थव्यवस्था घसरत असल्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्ये नोकरीसाठी जावे की नाही, या विचाराने सुमारे ४० टक्के भारतीयांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. भारतात चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून उच्च प्रशिक्षित नागरिक भारतात येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सुमारे ३४ टक्के भारतीय नागरिक अजूनही पाश्चिमात्य देशांमध्ये नोकरीसाठी प्राधान्य देतात, तर २६ टक्के लोक आपला व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या सुमारे २८ टक्के नागरिकांनी माहिती क्षेत्रात सर्वोत्तम संधी असल्याचे मत नोंदविले आहे. दूरसंचार आणि उत्पादन क्षेत्रातही चांगल्या संधी असल्याचे मत त्यांनी मांडले. चांगले वेतनमान, आकर्षक भत्ते, हे मुद्देही भारतीयांना मायदेशी परतण्याकामी महत्त्वाचे ठरत आहेत.

ओबामा यांचा बूस्टर डोस
भारत, चीनचे तरुण पुढे चालले आहेत त्यामुळे अमेरिकी तरुणांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे पण तरुण अमेरिकी लोकही त्यांच्यापेक्षा चांगले काम करून दाखवतील असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला. मेरीलँड येथे त्यांनी सांगितले की, तुम्ही अशा काळात वाढता आहात की, चांगल्या नोकऱ्यांसाठी तुम्हाला जगाशी स्पर्धा करावी लागेल, उर्वरित जगाशी, भारत-चीन या देशातील तरुणांशी तुम्हाला स्पर्धा करावी लागणार आहे. त्यांचे तरुण जागतिक अर्थव्यवस्थेत पाय रोवण्यास सज्ज आहेत त्यांची तुम्हाला मुख्यत्वेकरून स्पर्धा करावी लागेल, आपल्या देशातील तरुण त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवतील याबद्दल आपल्याला विश्वास आहे, पण पूर्वी आपण जे केले त्यावर विसंबून आत्मसंतुष्ट राहणार असाल तर मात्र तुम्ही मागे पडाल.  नवीन कल्पना शोधाव्या लागतील. कुठलीही गोष्ट करण्याचे वेगळे मार्ग शोधावे लागतील.