भागलपूर दंगलीप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचा मुलगा अरजित शाश्वत याला पोलिसांनी रविवारी अटक केली. दंगल आणि हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

बिहारमधील भागलपूर येथील नाथनगर पोलीस ठाणे या मुस्लीमबहुल भागांत १७ मार्च रोजी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या मिरवणुकीत दंगल झाली होती. या प्रकरणात दोन दिवसांनी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचा पुत्र अरजित शाश्वत आणि अन्य आठ जणांविरुद्ध दंगल आणि हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या परिसरातील १० नागरिकांविरुद्ध शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याचप्रमाणे गोळीबार केल्याबद्दल आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अरजित शाश्वत आणि त्यांच्या समर्थकांनी मोटारसायकल रॅलीसाठी परवानगी घेतली नव्हती, असे पोलीस तपासात समोर आले होते. याच रॅलीत स्पीकरच्या आवाजावरुन दोन गटात वाद झाला आणि यानंतर परिसरात हिंसाचार झाला. दगडफेकीच्या घटनांनी परिसरातील तणाव वाढला होता. या हिंसाचारात दोन पोलीस जखमी झाले होते.

भागलपूर न्यायालयाने शनिवारी अरजितचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याला अटक होणार, हे स्पष्ट झाले. पाटणा जंक्शन येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर परिसरात अरजित येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, यानुसार आम्ही सापळा रचून त्याला अटक केली, असे पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले. ‘मी कोणताही गुन्हा केलेला नसून भारत माता आणि श्री रामाच्या समर्थनार्थ घोषणा देणे हा गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे, असे त्यांनी अटकेनंतर माध्यमांना सांगितले. तर अश्विनीकुमार चौबे यांनी देखील माझ्या मुलावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले.