नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशावरून २० वर्षे पाळत ठेवण्यात आल्याच्या बातम्या असतानाच क्रांतिकारक भगतसिंग यांच्या नातेवाईकांवरही गुप्तचरांची पाळत ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सरदार भगतसिंग व सरदार अजित सिंग यांच्याबाबतच्या फाईलमधील माहिती उघड करावी, अशी मागणी भगत सिंग यांचे पुतणे अभयसिंग संधू यांनी मोहाली येथे केली.
संधू यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबावर अनेक वर्षे सरकारने पाळत ठेवली. आमची दूरध्वनी संभाषणे चोरून ऐकण्यात आली, त्यामुळे भगत सिंग यांच्याबाबतची कागदपत्रे उघड करावीत. ब्रिटिश काळापासून आमचे कुटुंब ब्रिटिशांच्या नजरेत होते व देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आमच्यावर गुप्तचर संस्था लक्ष ठेवीत होत्या. भगत सिंग यांचे काका व स्वातंत्र्यसैनिक अजित सिंग यांच्याविषयीची माहिती उघड करावी अशी मागणीही त्यांनी केली.  
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर नुसती हेरगिरीच केली नव्हती तर त्यातून मिळालेली विश्वसनीय माहिती ब्रिटनच्या एमआय ५ या गुप्तचर संस्थेला दिली होती, असे नुकत्याच उघड करण्यात आलेल्या वर्गीकृत कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.