मोबाइलद्वारे संसदेच्या आवारातील दृश्ये चित्रीत करुन व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान दोषी आढळले आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

भगवंत मान यांनी लोकसभेचे कामकाज कसे चालते हे दाखविण्यासाठी एक व्हिडिओ चित्रीत केला होता आणि तो अपलोड केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने भगवंत मान दोषी असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर त्यांना लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

या कारवाईनंतर मान हे उर्वरित अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत. भगवंत मान यांनी हा व्हिडिओ चित्रीत केल्यानंतर चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. चौकशी पूर्ण होऊन निकाल आल्यानंतर त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

‘मला संसदेची सुरक्षा धोक्यात येईल असे काही करायचे नव्हते. मला फक्त येथील कामकाज कसे चालते याची माहिती द्यायची होती म्हणून मी ही क्लिप बनवली आणि फेसबुकवर अपलोड केली अशी प्रतिक्रिया मान यांनी दिली होती.

‘देशातील सर्व पक्ष हे आम आदमी पक्षाविरुद्ध आहेत. येथे द्वेषाचे राजकारण चालते त्यामुळे जाणूनबुजून आपच्या खासदारांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत केला होता. आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिले नव्हते ते मी तुम्हाला दाखवतो असे सांगत लोकसभेच्या कामकाजाची १२ मिनिटांची व्हिडिओ क्लिप भगवंत मान यांनी फेसबुकवर टाकली होती.

भगवंत मान यांनी केलेल्या कृतीमुळे संसदेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याचबरोबर संसदेचे सदस्य म्हणून मिळालेल्या विशेष अधिकारांवरही गदा आल्याची भावना अनेक सदस्यांनी यावेळी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले होते.