पंजाबमधील जनतेला कॅन्सर, ड्रग्ज, माफियापासून मुक्ती हवी आहे. या सर्व समस्या सोडवण्याची ताकद ही आम आदमी पक्षातच (आप) असल्याचा त्यांना विश्वास आहे, असा दावा आपचे संगरूरचे खासदार भगवंत मान यांनी एएनआयशी बोलताना केला.
येत्या काही महिन्यात पंजाब विधानसभेची निवडणूक होणार आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी येथे आपचे पारडे सध्यातरी जड आहे. नुकताच विनोदी अभिनेता गुरूप्रीत घुग्गी याने पक्षात प्रवेश केला असून त्याला पक्षाच्या राज्य निमंत्रकाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनाही आपने पक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सिद्धू यांची स्वत: मुख्यमंत्री बनण्याची तसेच पत्नीलाही उमेदवारी देण्याची अट असल्याने पक्षाने नंतर स्वारस्य दाखवले नाही. अखेर सिद्धू यांनी पंजाबला नवा राजकीय पर्याय देत ‘आवाज-ए-पंजाब’ पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व पक्षातील असंतुष्टांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपचे नेते चिंतेत आहेत. भगवंत मान हेही पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
काही दिवसांपूर्वीच भगवंत मान हे वादग्रस्त ठरले होते. त्यांनी संसदेत प्रवेश करतानाचे चित्रण करून ते सोशल मीडियात व्हायरल केले होते. या चित्रणामुळे संसदेची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्यावर संसदेत चौकशीही सुरू आहे.