निवडणुकीत कोणतेही एक वक्तव्य पराभवाचे कारण ठरू शकत नाही. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील वक्तव्य बिहारमधील भाजपच्या पराभवाचे कारण ठरले, असे म्हणणे अयोग्य असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.

जेटली म्हणाले, बिहारचे गणित समजण्यातच आमची गडबड झाली. महाआघाडीच्या नावाखाली लालू, नितीश कुमार एकत्र आल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. बिहार विधानसभेत लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून जनतेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही कोण्या एकट्याची नाही तर ती भाजपमधील सर्वांची आहे. तसेच कोणत्याही एका वक्तव्याने निवडणुकीत पराभव होत नसतो. त्यामुळे मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा भाजपच्या पराभवाशी काहीही संबंध नसल्याचे जेटली म्हणाले. केंद्र सरकार बिहारला पूर्णपणे मदत करेल आगामी काळात आम्ही मताधिक्य परत मिळवू व बिहार विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असेही जेटली यांनी सांगितले.