अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश असून भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल लाखो रुपये उकळले होते, अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी यांनी आरोप केला होता की विनायक दुधाळे, शरद देशमुख हे दोघे एका तरुणीच्या मदतीने भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करत होते. या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी या दिशेने तपास सुरु केला आणि शेवटी या तिघांना अटक करण्यात आली.

वाचा: कोण आहे विनायक दुधाळे?

केअर टेकर म्हणून आली होती तरुणी
भय्यू महाराज यांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर एक तरुणी आश्रमात आली होती. केअर टेकर म्हणून ती आश्रमात आली. तिने भय्यू महाराज हे एकटे असल्याची संधी साधून त्यांच्याशी जवळीक वाढवली. काही दिवसांनी ती भय्यू महाराज यांच्या खोलीतच राहू लागली. भय्यू महाराज यांच्याशी लग्न करण्यासाठी तिने कट रचला. तिने भय्यू महाराज यांचा अश्लिल व्हिडिओ तयार केला तसेच भय्यू महाराज यांच्यासोबतचे अश्लिल चॅटिंगही सेव्ह करुन ठेवले होते.

भय्यू महाराज, आयुषी आणि ती
दरम्यानच्या काळात भय्यू महाराज यांच्या आयुष्यात शिवपुरीत राहणाऱ्या आयुषी आल्या होत्या. भय्यू महाराज यांनी एप्रिल २०१७ मध्ये आयुषी यांच्याशी लग्न केले. त्या तरुणीला याची कुणकुण लागताच तिने भय्यू महाराज यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तिने भय्यू महाराज यांना एक वर्षांची मुदतही दिली होती. या दरम्यानच्या काळात तिने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते. त्या तरुणीने दिलेली मुदत जून २०१८ मध्ये संपणार होती. १६ जूनला माझ्याशी लग्न करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तिने दिला होता.

तरुणीला शरद आणि विनायकने दिली साथ
ब्लॅकमेलचा कट विनायक आणि शरदने रचला होता. ते दोघे त्या तरुणीला भय्यू महाराजवर दबाव टाकायला सांगायचे. भय्यू महाराज यांनी अनेकदा त्या तरुणीशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. पण शरद आणि विनायक ती तरुणी तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देत आहे, असे भय्यू महाराजांना सांगायचे. या भीतीपोटी भय्यू महाराज त्या तरुणीशी बोलायचे.

कोट्यवधी रुपये घेऊन पळाला विनायक
पोलिसांनी भय्यू महाराज आणि त्या तरुणीच्या मोबाईलमधील व्हॉट्स अॅप चॅट रिकव्हर केले आहेत. यातून दोघांमधील अश्लिल संवाद समोर आले असून विनायक आणि त्या तरुणीमध्ये काय बोलणे व्हायचे याचाही उलगडा झाला आहे. आत्महत्येनंतर विनायक पसार झाला होता. त्याने भय्यू महाराज यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते, अशी माहिती समोर आली आहे. विनायक तब्बल १५ कोटी रुपये घेऊन पळाला होता, असे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaiyyu maharaj suicide case indore police arrest sevak vinayak and two others blackmailing
First published on: 19-01-2019 at 09:51 IST