ज्ञान आणि पैसा या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, याबाबत खेद नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदी यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना नेमाडे यांनी पंतप्रधानांना आणि ज्ञानपीठ न्यासाला आश्वासन दिले की ते यापुढेही काळाचे अचूक शब्दांकन करत राहतील आणि जे योग्य आहे ते लिहीत राहतील. भारतीय संस्कृती सतत नव्याचा स्वीकार करत आली आहे. त्यामुळेच ती रसरशीत बनली आहे. देशी बाबींचा पुरस्कार करणे म्हणजे संकुचित मनोवृत्ती असणे, हा गैरसमज असल्याचेही त्यांनी सांगितले.