देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच ८ जानेवारी रोजी बहुतांश बँक बंद राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांबरोबरच विरोधीपक्षांशी संबंधित कामगार संघटनांनी बंदची हाक दिली आहे. बँक कर्मचारी संघटनेही या संपाला पाठिंबा दर्शवला असल्याने एटीएम सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ८ जानेवारी रोजी भारत बंददरम्यानही बँकेचे व्यवहार सुरु राहतील असं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी इतर अनेक लहान मोठ्या बँकांच्या ग्राहकांना या बंदचा फटका बसणार आहे. उद्या बहुतांश बँका बंद राहतील. एसबीआयबरोबरच सिंडिकेट बँकेने आपला कारभार सुरळीत सुरु असेल असं स्पष्ट केलं आहे.

हे कराच

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोकड बँकेतून काढायची असल्यास किंवा बँकेसंदर्भात काही महत्वाचे कागदोपत्री काम असेल तर ते तुम्हाला संपाच्या दिवशी करता येणार नाही. ते काम तुम्हाला पुढे ढकलावे लागेल. अर्थात नेट बँकींग सेवा सुरु असल्याने ऑनलाइन फंड ट्रान्सफरचा पर्याय उपलब्ध असेल. उद्या अॅप बँकिंग आणि ऑनलाइन बँकींगद्वारे व्यवहार करता येतील.