News Flash

Bharat Bandh: बँकांसोबतच ‘या’ सेवांवरही होणार थेट परिणाम

सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी

कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येत आज बुधवारी दि. 8 जानेवारी रोजी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच महत्त्वाच्या बँक संघटना सहभागी होणार आहेत. परिणामी बहुतांश बँका बंद राहण्याची शक्यता आहे. एटीएम सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसबीआयने भारत बंददरम्यानही बँकेचे व्यवहार सुरु राहतील असं स्पष्ट केलं आहे. तरीही इतर अनेक लहान मोठ्या बँकांच्या ग्राहकांना या बंदचा फटका बसू शकतो. याशिवाय वाहतूक आणि अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशव्यापी कर्मचारी बंदला शिवसेनेने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर, काँग्रेस राष्ट्रवादीदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

कामगार मंत्रालयाने 2 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत एकाही मागणीबाबत ठोस आश्वासन न दिल्याने भारत बंद पुकारला , असे 10 कामगार संघटनांनी एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू यांच्यासह विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. या बंदमध्ये देशभरातल्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनाही सहभागी होण्याचीही शक्यता आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ते बंदमध्ये सहभागी होऊ शकतात. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकार एअर इंडिया विकण्याच्या तयारीत आहे. रेल्वेचंही खासगीकरण केलं जातंय. BSNL-MTNL विलीनीकरण झाल्याने 93600 कामगारांच्या नोकऱ्या गेल्यात. या खासगीकरण धोरणाविरोधात उद्याचा बंद आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन – सीटूच्या (CITU) वतीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.

सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी

या संपामध्ये राज्य सरकारी रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत. परिचारिकांसह, तंत्रज्ञ आणि साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद संपामुळे बुधवारी सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांसह जे.जे., जीटी, कामा, सेंट जॉर्ज रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी बुधवारी संपावर जाणार आहेत. जे.जे. समूहामधील जवळपास साडे चार हजार कर्मचारी या संपामध्ये उतरले आहेत. त्यामुळे बुधवारी परिचारिका, तंत्रज्ञ आणि साफसफाई कर्मचारी यासह शस्त्रक्रियागृहातील कर्मचारीही कामावर हजर राहणार नाहीत. याचा रुग्णसेवेवर याचा नक्कीच परिणाम होईल. बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहापर्यत हा संप सुरू असेल, असे जे.जे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी सांगितले.

शिवसेनेचा पाठिंबा

देशव्यापी कर्मचारी बंदला शिवसेनेने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने या बंदला दिलेल्या पाठिंब्याला राजकीयदृष्ठय़ा महत्त्व आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट होत असल्याचा आरोप कामगार संयुक्त कृती समितीने केला आहे. शिवसेनाप्रणित सर्व संघटना आपापल्या आस्थापनांसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.

महापालिकेचे लाखभर कर्मचारी सहभागी

मुंबई महापालिकेचे एक लाख दहा हजार कर्मचारी या आंदोलनात काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी दिली आहे. या संपाला पालिकेतील आठ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

काँग्रेसची मुंबईत निदर्शने

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी पक्षातर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. मुंबईत कामगार संघटनांच्या वतीने लालबाग, आझाद मैदान, विमानतळ, चेंबूर, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, पनवेल अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढून केंद्रातील भाजप सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी काँग्रेस सहभागी होणार आहे. त्या दिवशी बस, टॅक्सी, रिक्षा, एस. टी. वाहतूक, टेम्पो, ट्रक व कारखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतमाता, लालबाग व आझाद मैदान येथील मोर्चात व निदर्शनांमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

रेल्वे, बेस्ट, एसटी सुरळीत

संपाला रेल्वे, एसटी कामगार आणि बेस्ट संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे, बेस्ट व राज्यातील एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. केवळ संपाला पाठिंबा असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महासचिव वेणू नायर आणि वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे विभागीय सचिव प्रशांत कानडे यांनी सांगितले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनीही संपात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही’

चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी संप करत असल्याचे कळविले असून शासनाच्या आदेशानुसार हा नियमाच्या विरुद्ध आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही होमगार्ड, कंत्राटी कामगार बुधवारी बोलाविले आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रियांव्यतिरिक्त इतर शस्त्रक्रिया कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. संपामुळे रुग्णसेवा कोलमडणार नाही, याची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 8:37 am

Web Title: bharat bandh banking transport services may be hit due to strike sas 89
Next Stories
1 इराणचा अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला; ३० सैनिक मारल्याचा दावा
2 कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
3 दोषींना २२ जानेवारीला फाशी
Just Now!
X