कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दर्शवलेला असून केंद्र सरकारने यावरुन टीका केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केलं आहे.
तिकरी बॉर्डरवर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन
लोकसत्ता ऑनलाइन | Dec 08, 2020 02:36 pm

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद सोडून निघून गेले. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
भारत बंदमुळे एसटीच्या 3700 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड, नांदेड, परभणी, कोल्हापूर, पुणे, नाशिक विभागात एसटी सेवेवर परिणाम झाला आहे.
गाजिपूर येथे भारत बंददरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करुन दिला.
कृषी कायदा बदलाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असून आज भारत बंदची हाक त्यांनी दिली आहे. त्याला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद आहेत, तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र आहे. एकूण पाहता शेतकऱ्यांच्या भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद आहे.
सोनिपत येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याचा तिकरी बॉर्डरवर मृतदेह सापडला आहे. हा शेतकरी नव्या कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो तिकरी बॉर्डरवर वास्तव्यास होता. तिथेच उघड्या जागेत झोपला असताना सकाळी त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. थंडीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजय मूर असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या कुटुंबाला कळवण्यात आलं आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या शिखांच्या रॅलीला पोलिसांनी अडवलं आहे. मानखुर्द येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं असल्याने वाशी उड्डाणपूलावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
प्रत्येक गोष्ट भरकटवणे, देशाची बदनामी करण्याचा कट रचणं विरोधकांची जुनी पद्धत आहे. आपल्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अकाली दल, डावे पक्ष अशा विधेयकांचं समर्थन करत होतं असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे.
युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं. (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यापासून तसंच भारत बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून दिल्ली पोलिसांनी त्यांना घरात नजरकैदेत ठेवल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे. पक्षाकडून ट्विट करत हा आरोप करण्यात आला आहे. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंक
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदीजी शेतकऱ्यांडून चोरी बंद करा अशी टीका त्यांनी केली आहे. भारत बंदला समर्थन देऊन अन्नदात्याचा संघर्ष यशस्वी करा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
कोल्हापूर: भाजपा सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठीं व या कायद्यांना विरोध करण्यासाठीं आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात 'काळा झेंडा' उभारण्यात आला. पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतेज पाटीलयांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पुण्यात अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात शीख देखील सहभागी झाले असून "अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है" अशा घोषणा देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्रात तसेच राज्यातील कृषिमूल्य आयोगाकडून जो शेतमालाच्या खर्चाचा अभ्यास केला जातो त्याचा विचार करून शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवून विचार केला तर फडणवीसदेखील आंदोलनाला पाठिंबा देतील असं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी
दिल्ली येथील आंदोलनास समर्थन दर्शविण्यासाठी पुण्यातील अलका चौकात महाविकास आघाडीसह अन्य पक्ष, संघटना यांच्याकडून ठिय्या आंदोलन.
शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून त्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना विरोध केलेला नाही याकडेही लक्ष वेधलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. बुधवारी शेतकऱ्यांची भेट घेतल्यापासून त्यांनी घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं असल्याची माहिती आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
"मी संपूर्ण देशातून माहिती घेत होतो. जिथे भाजपाचं सरकार आहे तिथेही चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद मिळत आहे. कारण हा बंद राजकीय नाही तर भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वंयफूर्तीने ज्याच्या कष्टाचं अन्न आपण खात आहोत त्याच्यासाठी आहे. जो शेतकरी, कष्टकरी शेतावर राबत आहे त्याचे काही प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल काही मतभेद असू शकतील. पण गेले १२ दिवस थंडी, वाऱ्याची, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातील नाही तर जगातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जगात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मोर्चे निघाले आहेत," असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमधील महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. या लिंकवर क्लिक करा.
कोलकातामधील जबदरपूर रेल्वे स्थानकावर डाव्या पक्षांकडून रेल रोको आंदोलन करत रेल्वे रोखण्यात आली.
आज सकाळपासून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून माहिती घेतली. शहरी किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतूक तुरळक आहे. आम्ही रस्ता रोकोचं आवाहन केलेलं नव्हत, आणि लोकांनीही रस्त्यावर येणं टाळलं आहे. बंदमध्ये शेतकरीच नव्हे तर कष्टकरी, व्यवसायिक आणि छोटे व्यापारी सहभागी झाले असून खऱ्या अर्थाना अन्नदात्याशी एकनिष्ठ आहोत, पाठीशी उभे आहोत हे दाखवून दिलं आहे. सर्वसामान्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांना साष्टांग दंडवत घालतो. शेतकरी एकटा नाही हे चित्र पहायला मिळालं. अशी माझी कळकळीची विनंती आहे की, शेतकरी, कार्यकर्त्यांनी जबरदस्ती करुन नाही तर मत परिवर्तन करुन जनतेच्या पाठिंब्यावर बंद यशस्वी करुन राज्यकर्त्यांना दाखवायचा आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
“भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही” सविस्तर वाचा :
पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरु आहे. स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटलं आहे की, "आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. पण आम्ही मार्केट सुरु ठेवलं आहे जेणेकरुन इतर राज्यांमधून येणारा शेतमाल साठवता येईल. उद्याही त्याची विक्री होऊ शकते".
ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. भारतीय जय हिंद पार्टीकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आलंय यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.
केंद्र सरकारने आणलेल्या नव्याकृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताच निर्णय झाला नाही. अशात दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदमुळे वेळेत विमानतळावर न पोहोचू शकणाऱ्या प्रवाशांना विमान कंपनी एअर इंडियाने दिलासा दिला आहे. सविस्तर वाचा :https://www.loksatta.com/desh-videsh-news/bharat-bandh-air-indias-big-announcement-waives-no-show-for-flyers-unable-to-reach-airports-in-time-on-december-8-sas-89-2348276/
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी करत भारत बंदला सक्रिय सुरवात केली. तसेच केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहेत त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली.
ओडिशामधील भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर डावे पक्ष, व्यापारी संघटना आणि शेतकरी संघटनांनी रेल रोको आंदोलन करत रेल्वे रोखून धरली.
भारत बंद असला तरी मुंबईतील बेस्ट आणि रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. बेस्ट आणि रेल्वे सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष असेल अशी माहिती मुंबई पोलीस जनसंपर्क अधिकारी डीसीपी एस चैतन्य यांनी दिली आहे.
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला. असं असलं तरी भारत बंद दरम्यान सोमवारी काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. तसंच यासंदर्भात एक पत्रदेखील कृषीमंत्र्यांना देत नवे कायदे रद्द न करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी होणार असून माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्वात मोठी समिती ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि उपनगरात शेतमालाचा पुरवठा केला जातो. या बाजारात भाजीपाला, फळं, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट हे पाच बाजार आहेत. यातील व्यापारी आणि माथाडी यांनाही नवीन कृषी कायद्यांमुळे मोठा फटका बसणार आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन न करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
बुलडाण्यात भारत बंदच्या पार्श्वभूमीवरमलकापूर रेल्वे स्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चेन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली होती. सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी अडवण्यात आलेली ही एक्स्पेस नंतर पुढे सोडण्यात आली.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर माथाडी कामगारांनीही पाठिंबा जाहीर केल्याने नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समित्याही बंद राहतील. संवेदनशील भागांमध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील रेल्वे, बेस्ट, रिक्षा-टॅक्सी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. हा बंद राजकीय नसल्याने कोणीही सर्वसामान्य नागरिकांवर बंदची सक्ती करू नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर के ल्याने बंद कडकडीत पाळला जाईल, अशी चिन्हे आहेत. शिवसेना बंदमध्ये असल्यास सारे व्यवहार बंद होतात, असा नेहमीचा अनुभव. या वेळी मात्र शिवसेनेने बंदची जबरदस्ती नको, अशी भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आज एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. दरम्यान हजारे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन संपूर्ण देशभर सुरू झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.केंद्रात तसेच राज्यातील कृषिमूल्य आयोगाकडून जो शेतमालाच्या खर्चाचा अभ्यास केला जातो त्याचा विचार करून शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
मुंबई : ‘भारत बंद’ला मालवाहतूकदारांच्या संघटनांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी मालवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस’ने (एआयएमटीसी) पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
भारत बंदला ओला, उबेर संघटनांनी पाठिंबा जाहीर करत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन चालकांना केले आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ओला, उबेर सेवा बंद राहतील. मात्र बंदमध्ये सामील होण्यासाठी चालकांवर कोणतीही जबरदस्ती के लेली नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांना सहभागी होण्याचे आवाहन के ल्याचे ते म्हणाले.
‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.