तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले.

* तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम. कायद्यांमध्ये दुरुस्तीस तयार असल्याचा केंद्राचा पुनरुच्चार

* देशभरातील १८ विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ला पाठिंबा.  कामगार संघटना, व्यापारी, वाहतूकदारांकडूनही समर्थन

* दिल्लीसह काही राज्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

केंद्राच्या सूचना : ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

विकासासाठी सुधारणा आवश्यक असतात. नवी व्यवस्था, नव्या सुविधांसाठी त्याची गरज असते. गतशतकातील कायद्यांच्या आधारावर नव्या शतकाची उभारणी करता येत नाही.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान