तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले. याच बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामन्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच बंदच्या नावाखाली जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश योगींनी दिले आहेत.

राज्यातील अपर मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी बळजबरीने संपाच्या नावाखाली दुकाने आणि संस्था बंद ठेवण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलं आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या अधिकाऱ्यांशी पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्कात रहावे असे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड करणारी घटना होऊ नये यासंदर्भात दक्ष राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

आणखी वाचा- नवे कृषी कायदे रद्द करू नका, हरयाणातील काही शेतकरी संघटनांचं कृषीमंत्र्यांना पत्र

अवनीश अवस्थी यांनी नोएडा आणि दिल्लीच्या सीमेच्या पाच ते दहा किमी आधीच तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी काही समाजकंटक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जारी करण्यात आलेत. उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांच्या सीमांना लागून असणाऱ्या सीमांवर तपासणी केली जात आहे. सोमवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पश्चिम भागातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात ठेवण्याच्या सूचना केल्या. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यात यावे असं सांगण्यात आलं आहे. मेरठमधील अधिकऱ्यांशी संवाद साधताना शेतकरी आंदलोनाच्या नावाखाली सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागता कामा नये असंही योगी म्हणाले. ट्रॅक्टर, ट्रॉल्यांबरोबरच महागड्या गाड्यांमधून प्रवास करणारेही गोंधळाचा वातवरण निर्माण करु शकतात अशी शंका योगींनी बोलून दाखवली. जबरदस्तीने बाजारपेठा बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा आणि बाजारपेठा सुरळीत काम करतील याची काळजी घ्या, असंही योगी म्हणाले.