देशात करोनाच्या लाटेत दररोज तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. तर मृतांचा आकडाही नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतात करोना फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय मोठं हत्यार नाही. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक आहे. मात्र भारतात आढळून आलेल्या नव्या करोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे.

देशातील (B.1.617) आणि ब्रिटनमधील (B.1.1.7) या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. त्यानंतर भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्वीट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केलं आहे.

देशात सध्या तीन लशींचं लसीकरण सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूटद्वारे तयार केलेली कोविशील्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन आणि रशियातून आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लशींचा यात समावेश आहे. आतापर्यंत देशात १८ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Corona Crisis: ग्रामीण भागातील फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली

भारतात मागच्या २४ तासात ३ लाख ११ हजार १७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.