भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यास नकार दिल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनिष सिसोदिया यांनी दिल्लीने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे प्रत्येकी ६७ लाख असे एकूण १ कोटी ३४ लसींचे डोस पुरवण्याची मागणी केली होती अशी माहिती दिली. मात्र भारत बायोटेकने लसींचे डोस पुरवण्यास आपण असमर्थ असल्याचं दिल्ली सरकारला कळवलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लसींचा पुरवठा केले जात असल्याचं कळवलं असल्याची माहिती दिली.

भारत बायोटेक केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत होतं असा दावा मनिष सिसोदिया यांनी केला आहे. मनिष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने अतिरिक्त पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवताना खंत व्यक्त केली आहे. “इतर राज्यांना किती पुरवठा केली जात आहे माहिती नाही, मात्र त्यांनी आम्हाला केंद्र सरकारच्या आदेशामुळे दिल्लीला पुरवठा करु शकत नसल्याचं कळवलं आहे”.

दिल्लीमध्ये लसींचा राखीव पुरवठा संपत आला असल्याचं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. “आमचा राखीव साठा संपू लागला आहे. कोविशिल्ड लस देणारी केंद्रं कार्यरत आहेत, पण आम्हाला कोव्हॅक्सिन लस देणारी केंद्र बंद करावी लागत आहेत. १७ शाळांमधील १०० केंद्रं बंद करण्यात आली आहेत,” अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी दिली.

मनिष सिसोदिया यांनी यावेळी केंद्राकडे लसीशी संबंधित सर्व निर्यात थांबवण्याची आणि अधिकाधिक कंपन्यांना लस निर्मितीसाठी परवानगी देण्याची मागणी केली. “केंद्राने देशाचं सरकार असल्यासारखं वागावं. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडत सर्व निर्यात थांबवावी,” असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी लसींचे डोस आयात करावेत आणि सर्व राज्यांना उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणीदेखील केली.